दुष्काळातही मटक्याचा झटका सुरूच

By Admin | Updated: April 6, 2016 00:40 IST2016-04-06T00:32:57+5:302016-04-06T00:40:07+5:30

परभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्याची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असतानाही दुसरीकडे मटक्याचा बाजार मात्र बहरत आहे़

Due to the famine, the blow jolt continues | दुष्काळातही मटक्याचा झटका सुरूच

दुष्काळातही मटक्याचा झटका सुरूच

परभणी : दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्याची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असतानाही दुसरीकडे मटक्याचा बाजार मात्र बहरत आहे़ उन्हाळा असो की, पावसाळा हा व्यवसाय राजरोसपणे वाढतच चालला असून, लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून हात आहे़ पोलिस प्रशासन मात्र मटका व्यवसायाला लगाम घालण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे़
जिल्ह्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे़ पोलिस प्रशासन छोट्या मोठ्या कारवाया करते़ परंतु, अवैधरित्या सुरू असलेला हा मटका पूर्णत: बंद करण्यासाठी मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ मटका व्यवसायाच्या संदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारी परभणी शहरात स्टिंग आॅपरेशन केले़ शहरात ठिक ठिकाणी फिरून मटका व्यवसायाची माहिती घेतली असता शहरातील सर्वच गल्लीबोळांमध्ये मटक्याचा हा बाजार थाटल्याचे पहावयास मिळाले़
मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गव्हाणे चौकातून मटका बुकींचा शोध घेतला असता नवा मोंढा भागात तीन मटका अड्डे सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ पार्टीशनच्या टपरीमध्ये एका आडोशाला हा व्यवसाय सुरू असतो़
तासा-अर्ध्या तासाला चोरट्या पावलांनी एक-एक व्यक्ती येथे येत होता आणि मटका लावून जात असल्याचे पहावयास मिळाले़ याच भागात इठलापूर मोहल्ल्यातही एक मटका अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले़ येथून पुढे गंगाखेड रोड, बसस्थानक ते रेल्वेस्थानक या भागात ३ ते ४ टपऱ्यांवर मटका घेतला जात असल्याचे निदर्शनास आले़ तसेच सुपरमार्केट, ए-वन मार्केट, हडको, वसमत रोड, खानापूर फाटा, जुने आरटीओ आॅफीस, विद्यापीठ गेट, अक्षदा मंगल कार्यालय परिसर, जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर भाग अशा प्रत्येक दिशेला कोपऱ्या कापऱ्यामध्ये मटक्याचा व्यवसाय सुरू असल्याचे पहावयास मिळाले़
परभणी शहरातच जागोजागी मटक्याचा व्यवसाय चालतो़ जिल्हाभरातही या मटक्याचे जाळे किती मोठ्या प्रमाणात पसरले असावे, याचा अंदाज येतो़
शहरामध्ये साधारणत: १०० ते २०० मटक्याचे अड्डे आहेत़ या ठिकाणाहून दररोज लाखो रुपये जमा होतात़ विशेष करून झोपडपट्टी आणि स्लम एरिया भागात मटका बुकी जोरात चालते़
रोजंदारीवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करणारे अनेक जण दररोज एकदा तरी मटक्याचा आकडा लावत असल्याचे सांगण्यात आले़ झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मटका मात्र वाढत चालला आहे़
शहरात नवा मोंढा, कोतवाली, ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय तेजीत असल्याचे निदर्शनास येते़ पोलिस प्रशासनाच्या नावापुरत्या कारवाया या व्यावसायाला बळ देत आहेत़ मोठ्या बुक्कींवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा व्यवसाय जोमात सुरु आहे.
(प्रतिनिधी)
जिल्ह्यात दुष्काळामुळे एकीकडे एकएक व्यवसाय बंद पडत असताना आणि या व्यावसायिकांना नुकसानीचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे मात्र मटक्याच्या व्यवसाय तेजीत सुरू आहे़ पोलिस प्रशासन जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत या व्यवसायाचे समूळ उच्चाटन होणे शक्य नाही़

Web Title: Due to the famine, the blow jolt continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.