बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: August 19, 2014 02:11 IST2014-08-19T01:01:24+5:302014-08-19T02:11:03+5:30
रमेश शिंदे , औसा बैलपोळ्याचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, यंदा पावसाने गुंगारा दिल्याने हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट
रमेश शिंदे , औसा
बैलपोळ्याचा सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, यंदा पावसाने गुंगारा दिल्याने हा सण कसा साजरा करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. दरम्यान, बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सण म्हणून बैलपोळ्याकडे पाहिले जाते. शेतीत वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलांच्या श्रमाची उतराई व्हावी, या भावनेतून हा सण साजरा केला जातो. श्रावणमास संपल्यानंतर येणाऱ्या अमावस्येस हा सण असतो. या दिवशी बैलांना धुतले जाते. बैलांची सजवून मिरवणूक काढण्यात येते. तसेच गोडधोड खाऊ घालून पूजा-अर्चा करण्यात येते.
यंदा पावसाने उघडीप दिल्याने या उत्सवावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. पशुधनास चारा उपलब्ध नाही. त्यामुळे बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्वी पोळा सणाच्या पंधरा दिवस अगोदरपासून साहित्याने बाजारपेठा गजबजत. दुकानाच्या दर्शनी भागावर हे साहित्य लावून ग्राहकांना आकर्षित केले जात. परंतु, यंदा अद्यापही दुकाने सजली नाहीत. त्याचबरोबर गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के दरवाढ झाली असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
तालुक्यात जवळपास दीड लाख पशुधन आहेत. यात ६० हजारांपेक्षा जास्त बैलांची संख्या आहे. जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर पेरण्या झाल्या की, बैलांकडे शेतकरी विशेष लक्ष देत. त्यामुळे पोेळ्याच्या सणादिवशी बैल पाहण्यासाठी गर्दी होत असे. यंदा उशिरा पाऊस झाल्याने पेरण्या लांबल्या. गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने उघडीप दिल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पोळा सणावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बाजारपेठेतही शुकशुकाट दिसत आहे.