आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट

By Admin | Updated: July 8, 2014 00:58 IST2014-07-07T23:46:50+5:302014-07-08T00:58:58+5:30

एम.जी. मोमीन , जळकोट एक महिना उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाची कृपा झाली नाही़ परिणामी, पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़

Due to the doldrums on weekdays | आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट

आठवडी बाजारावर दुष्काळाचे सावट

एम.जी. मोमीन , जळकोट
एक महिना उलटला असला तरी अद्यापही वरुणराजाची कृपा झाली नाही़ परिणामी, पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ पावसाचा थेंबच नसल्याने विहिरी, साठवण तलाव, कूपनलिका आटल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांनी नव्याने पालेभाज्यांची लागवड केली नाही़ आठवडी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़त्याचबरोबर या पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत़ त्याची छाया जळकोटच्या सोमवारी आठवडी बाजारावर पडली असल्याचे पहावयास मिळाले़ एरव्ही बाजारपेठेत ग्रामीण भागातील बाजारकरुंची अधिक गर्दी असते़ परंतु, सोमवारी बाजारकरुंची संख्या रोडावली असल्याचे दिसून आले़ तसेच उलाढालही कमी झाल्याचे व्यापारी, शेतकऱ्यांनी सांगितले़
मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले़ पुनर्वसू नक्षत्र सुरु झाला असला तरी अद्यापही पावसाचा पत्ता नाही़ जोरदार वाहणारे वारे आणि त्याचबरोबर कडक पडणारे ऊन यामुळे पावसाळ्याच्या दिवसात उन्हाळ्याचा अनुभव येत आहे़ दुष्काळी परिस्थितीचा परिणाम आता बाजारपेठेवरही होऊ लागला आहे़
जळकोटचा सोमवारचा आठवडी बाजार म्हटले की, खेड्या-पाड्यातील नागरिकांची भाजीपाला खरेदीसाठी गर्दी असते़ ही गर्दी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत कायम असते़ मात्र, आज दुपारच्या वेळी आठवडी बाजारात फेरफटका मारला असता ग्राहकांची तुरळक गर्दी दिसून आली़ एकूण बाजारकरुंचा विचार केला असता शहरातीलच नागरिक जास्त होते़ आठवडी बाजाराचा मुख्य घटक म्हणून पालेभाज्या विक्रेत्यांकडे पाहिले जाते़ मात्र, तुरळक गर्दीचा सर्वाधिक फटका या विक्रेत्यांना बसला़ बाजारच्या अनुषंगाने अनेक विक्रेते ठोक स्वरुपात पालेभाज्या खरेदी करतात़ दिवसभर हा माल विक्री केल्यानंतर हातात अल्प रक्कम राहत आहे़ दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खेडेगावातून येणाऱ्या बाजारकरूंची संख्या रोडावली आहे़ परिणामी विक्रेत्यांना माल विक्रीसाठी काही वेळेस दरही काही प्रमाणात कमी आकारावा लागत आहे़ तसेच बाजार परिसरातील हॉटेल्समध्ये एरव्ही होणारी ग्राहकांची गर्दीही कमी झाली असल्याचे दिसून आले़ दुष्काळी परिस्थितीची छाया संपूर्ण आठवडी बाजारावर पडली असल्याने काही व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे पहावयास मिळाले़
जळकोट तालुक्यातील प्रमुख बाजारात भुसार मालाचा मी व्यापार करतो़ मागील आठ दिवसांपासून बहुतांश ठिकाणच्या बाजारावर दुष्काळी स्थितीची छाया दिसून आली़ एक किलो धान्य अथवा अन्य वस्तू खरेदी करणारा ग्राहक अर्धा किलो खरेदीवर आला आहे़ दाळी, शेंगदाणे, तेल याव्यतिरिक्त दुसरा माल घेण्यास ग्राहक धजावत नाहीत़ त्यामुळे आठवडी बाजारात किराणा माल घेऊन जाणे परवडेनासे झाले आहे़
-दशरथ खंदारे,
किराणा भुसार माल विक्रेते़
पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे़ त्यामुळे संबंधित पालेभाज्यांची बोली वाढत गेली़ परिणामी, एरव्हीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले़ आजच्या बाजारात जास्त दराने भाज्या विकाव्या लागल्या़ चार पैसे मिळतील, या आशेवरच आम्ही व्यवसाय करतो़ जास्त काही नाही किमान दिवसभराचा रोजगार निघावा हीच अपेक्षा असते़
- सैजादबी बागवान
पालेभाज्या विक्रेती़
दुष्काळी परिस्थिीमुळे बाजारात येणाऱ्या ग्रामीण भागातील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे़ याचा फटका फळ विक्रीला बसत आहे़ मुळात फळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असते़ असे असतानाच बाजारातील ग्राहकांची संख्याही कमी झाल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे़
- शामद बागवान
फळ विक्रेते़
सोमवारच्या आठवडी बाजार दिवशी प्रवाशांची मोठी गर्दी उसळते़ यामुळे ग्रामीण भागातील फेऱ्यांचे प्रमाण एरव्हीपेक्षा पाच पटीने वाढते़ मात्र, आजच्या आठवडी बाजाराचे वेगळेच चित्र दिसून आले़ प्रवाशांची संख्या कमी झाल्याने फेऱ्यांची संख्याही घटली़ त्यामुळे हाही व्यवसाय संकटात सापडला आहे़
- मन्मथ नरवटे,
टमटम चालक़
सर्वसाधारणपणे बाजारला ३०० रुपये लागतात़ या हिशेबाने बाजारात गेलो़ मात्र, आज पालेभाज्यांसह इतर वाणाची खरेदी करीत असताना किलोमागे दहा ते २० रुपयांचा फरक पडत गेला़ त्यामुळे पाचऐवजी तीन दिवस पुरेल एवढाच भाजीपाला घेता आला़ दुष्काळसदृश्य स्थितीमुळे भाजीपाल्यांचे भाव वाढले आहेत़ याचा फटका आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बसत आहे़
- हिदायततुल्ला तांबोळी
बाजारातील ग्राहक
पावसाने ओढ दिल्याने सर्वाधिक फटका पानमळ्यांना बसला आहे़ नजीकच्या परजिल्ह्यातून येणाऱ्या पानांची आवक कमी झाल्याने हैदराबाद, बंगळुरू येथून पानाची खरेदी करावी लागत आहे़ यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत़ असे असतानाच ग्राहकांची संख्या कमी झाली आहे़ ज्यादा पैसे देण्यास ग्राहक धजावत नाहीत़
- गोविंद मंगनाळे, पान विक्रेते़
दरवेळी बाजारच्या दिवशी हॉटेलमध्ये ग्रामीण भागातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते़ खाद्यपदार्थासोबतच चहालाही मोठी मागणी असते़ मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे हॉटेल व्यवसायही अडचणीत सापडला आहे़ आज तर ग्राहकांची संख्या निम्म्याने कमी झाली आहे़ हीच परिस्थिती कायम राहिली तर व्यवसाय करणे अवघड होईल़
- लक्ष्मण मंगनाळे,
हॉटेल मालक,
आठवडी बाजार, जळकोट़

Web Title: Due to the doldrums on weekdays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.