डकरे खून : तीन संशयित ताब्यात
By Admin | Updated: December 17, 2015 00:11 IST2015-12-16T23:57:52+5:302015-12-17T00:11:21+5:30
औरंगाबाद : चित्रा डकरे खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांना सिडको पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे.

डकरे खून : तीन संशयित ताब्यात
औरंगाबाद : चित्रा डकरे खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांना सिडको पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. यात दोन भावांचा समावेश आहे. बख्तियार खान ऊर्फ राजा, अय्याज खान आणि कलीम, अशी या संशयितांची नावे आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चित्रा डकरे खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या तीन जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून उचलले. यामध्ये कलीम खान हा करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनातील आरोपी आहे. तर अय्याज खान हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याखाली (एमपीडीए) हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. तत्पूर्वी त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई करण्यात आलेली होती. तर बख्तियार खान ऊर्फ राजा याच्याविरोधातही विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
सायबर क्राईम सेलची मदत घेण्यात आलेली आहे. घटनेच्या दिवशी आणि प्रसंगी मोबाईलवर संभाषण करणाऱ्या सिडको, हडकोतील सुमारे २५ हजार नागरिकांचे कॉल रेकॉर्ड (डम-डाटा) विविध कंपन्याकडून पोलिसांनी मागविले. आतापर्यंत एकाही आरोपीचे घटनास्थळाशी संबंधित ठसे जुळले नसल्याचे सूत्राने सांगितले.
भरदिवसा घरफोडी करणारे, लुटमार आणि दरोड्याचे गुन्हे असलेल्या सुमारे एक हजाराहून अधिक गुन्हेगार, प्रत्येक ठाण्याच्या हद्दीतील हिस्ट्री सीटरची पंधरा दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. मंगळवारी सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत शहरातील हिस्ट्री सीटर्सची पोलीस आयुक्तालयात झाडाझडती घेण्यात आली. स्वत: पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी त्यांचे रेकॉर्ड तपासले.