दुबार पेरणी अटळ
By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T23:41:02+5:302014-06-27T00:15:17+5:30
विठ्ठल फुलारी , भोकर तालुक्यातील किनी परिसरात १९ जूनला पडलेल्या ५५ मि़मी़ पावसाने आता शेतकऱ्यांपुढेच वैताग निर्माण केला आहे़

दुबार पेरणी अटळ
विठ्ठल फुलारी , भोकर
तालुक्यातील किनी परिसरात १९ जूनला पडलेल्या ५५ मि़मी़ पावसाने आता शेतकऱ्यांपुढेच वैताग निर्माण केला आहे़ या पावसानंतर किनी परिसरातील ८० गावांतील शेतकऱ्यांनी कापसाची व सोयाबीनची पेरणी केली खरी, पण यानंतर पाऊसच बेपत्ता झाल्याने या गावांवर आता दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ शेतकऱ्यांना जवळपास दीड कोटींचा फटका बसणार आहे़
आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली असली तरी भोकर तालुक्यात मोठा पाऊस नाही़ पण किनी परिसरात दि़१९ जूनला ५५ मि़मी़ पाऊस झाला़ यानंतरही पाऊस पडेल या आशेने पाळज, किनी, आमठाणा, नेकली, नसलापूर, मसलगा, दिवशी खु़, दिवशी बु़, कांडली पाकी, महागाव, भुरभूशी गारगोटवाडी, नांदा खु़, मोखंडी तांडा यासह २० गावांतील शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली व काही प्रमाणात सोयाबीन पेरली़ पण तेव्हापासून मात्र पावसाचा पत्ताच नाही़ पेरलेल्या बियाणे पैकी कुठे उगवले तर कुठे मातीच्या बाहेर कोंबही आला नाही़ उगवलेल्या रोपट्यालाही आता पावसाच्या सरीची गरज आहे़ पण पाऊसच पडायला तयार नाही़ यामुळे या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे़ शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़ एकूणच शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पाऊस कधी पडेल, याची चिंता अनेकांना सतावत आहे.
सदरील परिस्थितीची पाहणी तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी केली आहे़ कृषी कार्यालयामार्फत या परिसरात ३ हजार ८४१ हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी यापेक्षा जास्त पेरा झाला असल्याचे शेतकरी म्हणत आहेत़
दीड कोटींचा बसणार फटका
किनी परिसरात झालेल्या कापसाच्या लागवडीवर बियाणे, मजुरी धरून दीड कोटीच्या जवळपास खर्च झाला आहे़ दोन दिवसांत पाऊस न झाल्यास यातील कोणतेच रोपटे जगण्याची शाश्वती नाही़ यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या बियाणावर खर्च केलेल्या दीड कोटींचा फटका सहन करावा लागणार आहे़
हवामान आधारित पीक विमा योजनेत उडीद, कापूस, मूग व सोयाबीन या पिकाचा समावेश केला आहे़ या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घेण्यासाठी ३० जूनपर्यंत या पिकाचा हप्ता भरावा यासाठी तालुका कृषी कार्यालयासाठी संपर्क साधावा -रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी, भोकर
कर्ज काढून, दागिने विकून महागामोलाचे बियाणे काळ्या आईच्या स्वाधीन केले़ पण पावसानेच पाठ फिरविल्याने हे बियाणे आता वाया जाणार आहेत़ पोटाला चिमटा देवून केलेल्या कापसाच्या लागवडीकडे पाहून डोळ्यात अश्रू येतात़ हे अश्रू आता कोणाला कळतील -शंकरराव देशमुख, विठ्ठल बत्तलवाड (शेतकरी, देवठाणा)