जानेवारीपासून वाळूटंचाई मिटणार
By Admin | Updated: December 29, 2014 01:08 IST2014-12-29T01:02:50+5:302014-12-29T01:08:24+5:30
औरंगाबाद : प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील ४४ वाळूपट्टे लिलावासाठी काढले असून, त्यांचा आॅनलाईन लिलाव ७ जानेवारी रोजी होणार आहे.

जानेवारीपासून वाळूटंचाई मिटणार
औरंगाबाद : प्रशासनाने यंदा जिल्ह्यातील ४४ वाळूपट्टे लिलावासाठी काढले असून, त्यांचा आॅनलाईन लिलाव ७ जानेवारी रोजी होणार आहे. वरील सर्व वाळूपट्ट्यांची एकत्रित सरकारी किंमत २३ कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. लिलावानंतर लगेचच या पट्ट्यांमधून वाळू उपलब्ध होऊ शकणार आहे.
जिल्ह्यातील सर्व वाळूपट्ट्यांची मुदत तीन महिन्यांपूर्वीच संपली आहे. मात्र, त्यानंतर चालू वर्षासाठी लिलाव न झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाळू मिळणे अशक्य झाले आहे. काही जण चोरट्या मार्गाने शहरात वाळू आणून विकत असले तरी त्यासाठी कित्येकपट अधिक किंमत आकारली जात आहे. आता प्रशासनाने येत्या ३० सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्यातील ४४ वाळूपट्टे लिलावासाठी काढले आहेत. यामध्ये ४१ स्वतंत्र आणि ३ संयुक्त वाळूपट्ट्यांचा समावेश आहे. प्रत्येक वाळूपट्ट्याची सरकारी किंमत निश्चित करण्यात आली असून, लिलावात या किमतीच्या वरच बोली बोलली जाणार आहे.
जिल्ह्यातील ४१ संयुक्त वाळूपट्ट्यांची एकूण सरकारी किंमत ८ कोटी ८० लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर तीन संयुक्त वाळूपट्ट्यांची किंमत १४ कोटी रुपये एवढी आहे.
दोन्ही प्रकारच्या वाळूपट्ट्यांची सरकारी किंमत २३ कोटी रुपये आहे. सर्व वाळूपट्टे लिलावात गेल्यास प्रशासनाला सरकारी किमतीपेक्षा किती तरी जास्त रक्कम मिळू शकणार आहे.
सव्वालाख ब्रास वाळू उपलब्ध होणार
लिलावानंतर जिल्ह्यातील वाळूपट्ट्यांतून ३० सप्टेंबर २०१५पर्यंत वाळू उपसा सुरू राहणार आहे. संयुक्त वाळूपट्ट्यातून ८० हजार आणि स्वतंत्र वाळूपट्ट्यातून ४० हजार, अशी १ लाख २० हजार ब्रास वाळू उपलब्ध होणार आहे.