५० लाखांच्या क्रीडा साहित्यांवर धूळ
By Admin | Updated: February 4, 2015 00:42 IST2015-02-04T00:26:33+5:302015-02-04T00:42:21+5:30
येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडूंना खेळण्यासाठी आलेले ५० लाखांचे क्रीडा साहित्य मागील काही महिन्यांपासून धुळखात पडून आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे

५० लाखांच्या क्रीडा साहित्यांवर धूळ
सोमनाथ खताळ , बीड
येथील जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडूंना खेळण्यासाठी आलेले ५० लाखांचे क्रीडा साहित्य मागील काही महिन्यांपासून धुळखात पडून आहे. केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व नियोजनाचा अभाव असल्यामुळे याची दुरवस्था झाली आहे. क्रीडा कार्यालयाचे असेच धोरण असेल तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू कसे निर्माण होणार? असा प्रश्न उपस्थित होत असून खेळाडूंच्या भावनेशी ‘खेळ’ खेळला जात आहे. मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टींगमधून हे भयान वास्तव समोर आले.
महाराष्ट्रातील खेळाडू आशियाई, जागतिक स्तरावर चमकविण्याच्या दृष्टीने योग्य त्या क्रीडा सुविधा गावोगावी करून देणे आवश्यक आहे. यासाठी खाजगी गुंतवणूकदार, कॉर्पारेट बॉडीज, खाजगी कंपन्या यांच्यासह आवश्यक त्या व्यक्तींना यामध्ये सामावून घ्यावे, तसेच तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकूल कसे असावे, त्यात खेळाडूंना कोणत्या दर्जाच्या सुविधा द्याव्यात, यासंदर्भात प्रत्येक क्रीडा कार्यालयाला सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाचे परीपत्रक आहे. मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालयात अशी कुठलीच सुविधा दिली जात नाही. लाखो रूपयाचे साहित्य केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आणि योग्य नियोजन नसल्यामुळे कार्यालयाच्या विविध भागात धुळखात, अस्तव्यस्त पडलेले असल्याचे स्टींगमधून समोर आले.
जिल्हा क्रीडा कार्यालयाने खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असा शासन अध्यादेश आहे. मात्र येथील परिस्थिती पाहिली तर कोणी सुद्धा म्हणनार नाही की हे जिल्हा क्रीडा कार्यालय असेल म्हणून. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळेच आज चांगले खेळाडू घडत नाहीत, असा आरोप मनविसेचे शैलेष जाधव यांनी केला जात आहे.
चार ठिकाणी चार साहित्य
खेळाडूंसाठी आलेले साहित्य हे चार ठिकाणी पडलेले आहे. विशेष म्हणजे काही साहित्य तर नवे असून देखील त्याची योग्य ठिकाणी ठेवण्याची सोय केलेली नाही. गाद्या पायऱ्यावर पडलेल्या आहेत, तर खोलीतील साहित्याची केवळ थपी लागलेली आहे.
साहित्याचा होईना उपयोग
क्रीडा संचालनालयाकडून क्रीडा साहित्य दिले जाते, मात्र त्याचा योग्य उपयोग केला जात नाही. इतर ठिकाणी साहित्याची मागणी होत असते मात्र येथील जिल्हा क्रीडा कार्यालय याला अपवाद आहे. येथे साहित्य उपलब्ध असुनसुद्धा ते मिळत नसल्याची खेळाडंूची ओरड आहे.
५० लाखांत या साहित्यांचा अभिप्राय
अॅथेलेटिक्स सर्व साहित्य जिम्नॅस्टिक , मल्लखांब, बॉक्सींग रिंग, कुस्ती, ज्यूदो, तायक्वांदो व जिम्नॅस्टिक्स मॅटस, लॉन टेनिस, तलवार बाजी, शूटिंग रेंज व एअर वेपन तसेच अन्य साहित्य, टेबल टेनिस, बिलियर्डस व स्नूकर, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आदी हालविण्याजोगे साहित्य, इनडोअर गेमचे अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात यावे, असाही शासन नियम आहे.