जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती
By Admin | Updated: August 13, 2014 00:51 IST2014-08-13T00:15:16+5:302014-08-13T00:51:00+5:30
जालना : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून

जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती
जालना : जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून खरीप पिकांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. ग्रामीण भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होत असून अशीच स्थिती राहिल्यास जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आगामी काळात निर्माण होणार आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
२०१२ च्या भीषण दुष्काळानंतर २०१३ मध्ये पर्जन्यमान चांगले राहिल्याने जिल्हावासियांना विशेषत: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. यावर्षी कोणते पीक घ्यायचे, याचा विचार करून बळीराजा मृगनक्षत्राची वाट पाहत होता. मात्र मृग गेले, आर्द्राही गेले, तरीही पाऊस झाला नाही. तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हलक्या स्वरूपाच्या का होईना दोन-तीन वेळा झालेल्या पावसामुळे व आता चांगला पाऊस होईल, या आशेवर १५ जुलै २०१४ पर्यंत जिल्ह्यात १ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. १५ ते ३१ जुलै या काळातही एक-दोन हलक्या स्वरूपाच्या पावसाने पेरणीचे प्रमाण सव्वातीन लाख हेक्टरवर गेले.
६ व ७ आॅगस्ट या काळात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सर्वसाधारणपणे ४ ते २२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद वेगवेगळ्या भागात झाली.
या पावसामुळे १२ आॅगस्टपर्यंत ५ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिके २० ते २५ दिवसांच्या काळातील आहेत. भीज पाऊस झाला नाही,अशा ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पिकांना खत दिले. परंतु जवळपास ठिकाणी पिकांची वाढ खुंटलेली आहे. सोयाबीनची पाने सुकलेली आहेत. कपाशी तग धरून असली तरी पावसाची गरज आहे. मात्र गेल्या सलग चार दिवसांपासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने उकाडा जाणवत आहे. या उन्हाचाही आतापर्यंत आलेल्या पिकांवर विपरित परिणाम होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र त्याचबरोबर सोयाबीनचा पेराही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केला. सोयाबीनचे बी बाजारात लवकर मिळत नसल्याने घरच्या बियाणाचीच लागवड करण्यात आली. परंतु पावसाअभावी काही ठिकाणी दुबार पेरणीही करावी लागली. आगामी दोन-तीन दिवसांत पावसाची गरज असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले. कपाशी तग धरणारे पीक आहे. परंतु अन्य पिकांना पावसाची अत्यंत गरज आहे.
जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी ५ लाख ६१ हजार ३६० हेक्टर एवढे आहे. कपाशीची पेरणी सुमारे सव्वादोन लाख हेक्टरमध्ये झाली. सोयाबीनची पेरणी एक लाखापेक्षा अधिक हेक्टरमध्ये झाली.
४मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६० हजार १०० हेक्टर आहे. त्याचीही पेरणी ९० टक्के झाली. यासह ज्वारी, बाजरी, तूर भुईमूग, सूर्यफूल इत्यादी पिकांची पेरणी केली. मात्र पावसाअभावी या पिकांची वाढ खुंटलेली आहे. या काळात दीड फुटांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.