ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:07 IST2021-05-05T04:07:12+5:302021-05-05T04:07:12+5:30
सोयगाव : ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करताना चालकाचा ताबा सुटल्याने बांधासमोरील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालक ट्रॅक्टरखाली दबून ...

ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा मृत्यू
सोयगाव : ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करताना चालकाचा ताबा सुटल्याने बांधासमोरील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालक ट्रॅक्टरखाली दबून ठार झाल्याची दुर्घटना निंबायती शिवारात मंगळवारी (दि.४) दुपारी घडली. अमोल रमेश झाल्टे (२६) असे ठार झालेल्या शेतमजूर तथा चालकाचे नाव आहे. तरूणाच्या मृत्यूने निंबायती गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निंबायती शिवारातील गट क्रमांक ३१ मध्ये रमेश झाल्टे हा तरुण स्वतःच्या शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी करीत होता. बांधाच्या शेजारी ट्रॅक्टर वळविताना चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर थेट बांधाच्या नाल्यात पलटी झाला. यात चालक रमेश यांचा दबून मृत्यू झाला. ही बाब शेतशिवारात असलेल्या नागरिकांच्या लक्षात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. दरम्यान सोयगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
झाल्टे परिवारावर शोककळा
खरीप हंगामाच्या दृष्टीने शेती मशागतीची कामे सुरू झाली आहे. अमोल झाल्टे हे स्वत: ट्रॅक्टर चालवून नांगरणी करीत होते. या दुर्घटनेने झाल्टे परिवारावर शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, तीन बहिणी, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
दोन फोटो आहे.