ठिबकवरील कपाशी धोक्यात
By Admin | Updated: June 29, 2014 00:44 IST2014-06-29T00:39:45+5:302014-06-29T00:44:45+5:30
भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे.
ठिबकवरील कपाशी धोक्यात
भोकरदन : जून महिना संपत आला तरी पाऊस आला नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. उन्हाळी कापसाची लागवड केलेल्या कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. एकूणच पावसामुळे शेतकरी तसेच व्यापारीवर्गातून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात गेल्या वर्षी १ जूनलाच पिकाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी जून महिना संपत आला तरीसुध्दा एकही मोठा पाऊस झालेला नाही. परिणामी, सर्वच ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे, त्यांनी ठिबक सिंचनावर कपाशी, मिरचीची लागवड केली, ती पिके पिवळी पडत आहे. वाढ खुंटली आहे.
उन्हाळी पिकांसाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला. मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे. तालुक्यात खरीप पेरणी खोळंबली आहे. भोकरदन परिसरातील रामेश्वर सोनाजी राऊत यांनी गट नंबर २९ मध्ये २० मे रोजी ८ एकरमध्ये कपाशीची लागवड केली. पीकसुध्दा चांगले जोमदार आले. मात्र लागवडीनंतर २० दिवसांनी कपाशीची झाडे पिवळी पडू लागली आहेत. तसेच वाढ खुंटली आहे. अनेक फवारण्या केल्या. खत दिले तरीसुध्दा कपाशीचा पिवळेपणा गेलेला नाही. सदर सीडस् कंपनीच्या अधिकाऱ्यांनी औषधी फवारणी करण्यास सांगितले.
आठ दिवसांत पीक सुधारेल याची हमी दिली आहे. तसेच त्यांनी तालुका कृषी कार्यालयाकडेसुध्दा धाव घेतली. मात्र कृषी कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. तालुका कृषी अधिकारी व्यवहारे म्हणाले, आमच्याकडे शेतकऱ्याने अर्ज दिलेला आहे.
दोन तीन दिवसांमध्ये बदनापूर येथील तज्ज्ञांमार्फत कपाशी पिकाची तपासणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पाऊस लांबत असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीवर्गातून तीव्र चिंंता व्यक्त केली जात आहे. बियाणे तसेच इतर बाजारात शुकशुकाट आहे. बियाणे व्यापाऱ्यांनी लाखो रुपये खर्च करुन साहित्य तसेच बियाणांची खरेदी केली. मात्र पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने बाजारात शुकशुकाट आहे. पाऊस पडल्यास शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांनाही लाखो रुपयांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
दिवसा ऊन रात्री चांदणे
परतूर: दिवसा जोराचा वारा, कडाक्याचे उन, रात्री चांदणे भर पावसाळ्यात असे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. जून संपत आला असला तरी पावसाचा पत्ताच नाही. पावसाळ्यातही उन्हाळ्याच्या खुणा कायम आहेत. उन्हाचा कडाका, जोराचा वारा, यामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांनी पेरणी योग्य जमिनी करून ठेवल्या असल्या तरी, पावसाचा पत्ताच नाही, अद्याप एकही पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतं काळीभोर आहेत. काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कापसाची लागवड केली आहे. पाउसच नसल्याने ठिबकसाठीही पाणी कमी पडत असल्याने हे पिके माना टाकत आहेत. एकूणच पावसाने दडी मारल्याने व पेरणीची वेळ निघून जात असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत.