पिण्याच्या पाण्याचा शहरात ठणठणाट !
By Admin | Updated: July 27, 2015 01:11 IST2015-07-27T01:08:45+5:302015-07-27T01:11:48+5:30
लातूर : लातूर शहरात गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मांजरा प्रकल्पावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीत लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले

पिण्याच्या पाण्याचा शहरात ठणठणाट !
लातूर : लातूर शहरात गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. मांजरा प्रकल्पावरून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीत लिकेज झाल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे लातूर शहरातील नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. रविवारी शहराच्या पूर्व भागातील काही नगरांत नळाला पाणी सोडले गेले. परंतु, अर्ध्या तासातच पाणीपुरवठा बंद झाला. परिणामी, नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
प्रभागनिहाय पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक मनपाने प्रसिद्ध केले आहे. मात्र या वेळापत्रकाप्रमाणे गेल्या महिनाभरापासून पाणी सोडले जात नाही. कधी तांत्रिक अडचण तर कधी काटकसर करण्याचे कारण सांगून वेळापत्रक पाळले जात नाही. दहा दिवसांआड सोडण्यात येणारे पाणी आता कधी पंधरा तर कधी १७-१८ दिवस सोडले जात नाही. त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. नागरिकांची मागणी वाढल्यामुळे पाण्याचे दरही वधारले आहेत. एका टँकरला ४५० ते ५०० रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय, ते पाणी पिण्यायोग्यही नाही. त्यामुळे काही मध्यमवर्गीय लोक जार वॉटर खरेदी करीत आहेत. २० लिटर्सच्या एका जार वॉटरला ३० रुपये तर चांगल्या कंपनीच्या २० लिटर्सच्याच एका जारला ३०, ४०, ५० रुपये देऊन पाणी घ्यावे लागत आहे. परंतु, हे पाणीही पिण्यासाठी योग्य असेल याची खात्री नाही. परंतु, मनपाकडून पाणीपुरवठाच होत नसल्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.
लातूर शहरातील पश्चिम भागातील प्रकाश नगर, विकास नगर, पाण्याची टाकी परिसर, संभाजी नगर अशा एक-दोन नगरांत रविवारी अर्धा तास पाणी सोडण्यात आले. परंतु नागरिकांना पुरेसे मिळाले नाही. चौधरी नगर, विक्रम नगर, सुभेदार रामजी नगर, पद्मा नगर परिसर, शाम नगर, संभाजी नगर, खाडगाव रोड परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाणी सोडण्यात आले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. लातूर शहरातील गाव परिसर व पूर्व भागात परिसरातही पाणीटंचाई आहे. १५ ते २० दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. ४
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा तळाला गेला असून, सध्या प्रकल्पात २़६३४ दलघमी पाणीसाठा आहे़ या प्रकल्पातून लातूर शहरासह अंबाजोगाई, धारुर, केज, कळंब आदी शहरांना पाणीपुरवठा केला जातो़ एकट्या लातूर शहराला दररोज ३५ एमएलडी पाणी दिले जाते़ प्रकल्पातील उपलब्ध साठा आणि उचल लक्षात घेता आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले जात असले, तरी लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून निर्जळी आहे.
४गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असल्याने नागरिकांची गैरसोय आहे.