पानटपरी चालकाच्या मुलाचे ‘डॉक्टर’ बनण्याचे स्वप्न
By Admin | Updated: June 18, 2014 01:30 IST2014-06-18T00:54:44+5:302014-06-18T01:30:53+5:30
कळमनुरी : केवळ एक एकर शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालविणारे कैलासराव रोडगे यांचा मुलगा वैभव याने दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण

पानटपरी चालकाच्या मुलाचे ‘डॉक्टर’ बनण्याचे स्वप्न
कळमनुरी : केवळ एक एकर शेतजमीन असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी पानटपरी चालविणारे कैलासराव रोडगे यांचा मुलगा वैभव याने दहावीच्या परिक्षेत ९६.२० टक्के गुण संपादन करून कळमनुरी येथील महात्मा ज्योतीबा फुले माध्यमिक विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
कळमनुरी येथील कैलासराव रोडगे यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा वैभव दहावीत तर मुलगी सातवीत शिकत असल्याने त्यांचा शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. मुलांच्या शिक्षणासाठी घर कळमनुरीत ठेवून ते औंढा नागनाथ येथे पानटपरीसह कोड्रींक्स विक्रीचा व्यवसाय करतात. आठवीत असल्यापासून वैभवने भाषा विषय म्हणून संस्कृतची केलेली निवड आज त्याच्या यशाचा आलेख उंचावण्यास महत्वाची ठरली आहे. दहावीच्या परिक्षेत वैभव रोडगे याला संस्कृतमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. इतर विषयांमध्ये सरासरी ९५ गुण त्याने संपादन केले आहेत. ५०० पैकी ४८१ गुण संपादन करून त्याने महात्मा फुले विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
आठवी-नववीमध्येही त्याने संस्कृतमध्ये ९९ गुण घेतले होते. त्यामुळे दहावीच्या अभ्यासाबाबत त्याला आत्मविश्वास होता. सराव परिक्षेत ९७ टक्के गुण घेतल्यामुळे वार्षिक परिक्षेत ९५ टक्केपेक्षा अधिक गुण निश्चित मिळवेन असे त्याने आधीच सांगितले होते, असे कैलासराव रोडगे म्हणाले. कळमनुरी येथील रामभाऊ कोळपे यांच्या अभ्यासिकेत स्टडी सर्कलच्या माध्यमातून सर्व विषयांची तयारी करून घेण्यात आली. तसेच शंकरराव सातव महाविद्यालयातील प्रा. एम. एस. रोडगे या काकानेही इंग्रजी विषयाची भीती दूर केल्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो, असे वैभव सांगतो. याशिवाय शाळेतील शिक्षक पी. बी. जगताप, जे. जे. गांगजी, बी. के. राठोड यांचेही त्याला मार्गदर्शन मिळाले. घरी दररोज चार ते पाच तास अभ्यास करून हे घवघवीत यश मिळवलेला वैभव कौतुकाचा मानकरी ठरत आहे.
अभ्यासामध्ये अग्रेसर असलेल्या वैभवला क्रिकेट खेळण्याची आवड आहे. तसेच जुने चलनी नाणे-नोटा गोळा करण्याचा छंदही त्याने जोपासला आहे. आतापर्यंत २० देशांमधील १५० चलनी नाणे तसेच नेपाळ, अमेरिकासारख्या देशांच्या २० नोटाही त्याच्याकडे संग्रही आहेत. अभ्यासाची गोडी वाढवण्यासाठी छंद उपयोगी ठरतात असे सांगणारा वैभव नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेणार आहे. बारावीला चांगले गुण घेऊन पुढे डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे. मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तुम्हाला मुलाचा वैद्यकीय शिक्षणाचा खर्च झेपेल का? असा प्रश्न विचारताच कैलारावराव रोडगे म्हणाले, ‘आमच्याकडे केवळ एक एकर जमीन आहे. गरज पडल्यास ती जमीन विकून मुलाला डॉक्टर बनवू.’ (वार्ताहर)
यशासाठी...
दररोज चार ते पाच तास केला अभ्यास.
इंग्रजीची भीती दूर केल्यामुळे मिळविता आले यश.
अभ्यासिकेमध्ये स्टडी सर्कलच्या माध्यमातून करून घेण्यात आली सर्व विषयांची शिक्षकांकडून तयारी.
सराव परिक्षेत ९७ टक्के गुण मिळविल्याने अधिक गुण मिळविण्याचा विश्वास.