ड्रेनेजच्या पाण्याची चोरी; उद्यापासून कारवाईची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 20:26 IST2019-01-20T20:26:06+5:302019-01-20T20:26:36+5:30
महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे मेनहोल फोडून दुषित पाण्याची चोरीही अनेक ठिकाणी सुरू आहे. २३ जानेवारीपासून महापालिका संबधितांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ड्रेनेजच्या पाण्याची चोरी; उद्यापासून कारवाईची मोहीम
औैरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते वाळूजपर्यंत खाम नदीपात्रातील दुषित पाण्यावर भाजीपाला शेती करणारे शेतकरी आहेत. या पाठोपाठ महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे मेनहोल फोडून दुषित पाण्याची चोरीही अनेक ठिकाणी सुरू आहे. २३ जानेवारीपासून महापालिका संबधितांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेने केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत शहरात भूमिगत गटार योजनेतून ड्रेनेज लाईन टाकल्या आहेत. तीन ठिकाणी एसटीपी प्लांट उभारले आहेत. कांचनवाडी, पडेगाव, बनेवाडी, झाल्टा येथे पालिकेने प्रक्रिया केंद्र उभारले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे मलमिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध केले जाते.
या प्रक्रिया केंद्रात मलजल पोहोचवण्यासाठी पालिकेने टाकलेल्या वाहिन्यांच्या मेनहोलला भगदाड पाडून काही शेतकरी व इतर लोक पाणी चोरी करीत आहेत. यामुळे पालिकेच्या प्रकल्पास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे याप्रकरणी दाखल याचिकेत न्यायालयाने नुकतेच अशा पाणी पळविणाºयांवर प्रत्यक्ष पाहणी, पंचनामा करून मोटारी व इतर साहित्य जप्त करण्याची व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवार व बुधवार अशी दोन दिवस २२ व २३ तारखेला महापालिका पथक नेमून कारवाई करणार आहे.
तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल २४ तारखेला न्यायालयात सादर करावा लागणार आहे. ज्या शेतक-यांनी अशाप्रकारे ड्रेनेज लाईनवर मोटारी बसविल्या आहेत, त्यांनी मोटारी काढून घ्याव्यात, असे आवाहन मनपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.