विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ब्रेक
By Admin | Updated: June 22, 2014 00:09 IST2014-06-21T23:57:47+5:302014-06-22T00:09:13+5:30
कळंब : राज्यात आता शिक्षणाचा हक्क हा अधिनियम लागू झाला असून, त्यानुसार कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४६ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीचे नवीन वर्ग सुरु झाले

विद्यार्थ्यांच्या अप-डाऊनला ब्रेक
कळंब : राज्यात आता शिक्षणाचा हक्क हा अधिनियम लागू झाला असून, त्यानुसार कळंब तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४६ प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीचे नवीन वर्ग सुरु झाले आहेत. या नवीन वर्गामुळे शैक्षणिक सुविधा नसल्याने त्या-त्या गावातील पाचवी आणि आठवीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्थलांतरही थांबले आहे.
६ ते १४ वयोगटातील बालकांना शिक्षण हा मुलभूत हक्क असल्याचे मान्य करणारा व मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करुन देणारा १ एप्रिल २०१० रोजी देशात शिक्षण हक्क अधिनियम अस्तित्वात आला. हा अधिनियम राज्याने अंगीकारला असल्यामुळे आता प्राथमिक शिक्षणाचा स्तर इयत्ता आठवीपर्यंत येणार आहे. यामुळे तालुक्यातील ज्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत शिक्षणाची सोय होते. पाचवीचा नवीन वर्ग व इयत्ता सातवीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या शाळेत इयत्ता आठवीच्या नवीन वर्ग सुरु होणार आहे.
१७ शाळेत आठवीचा नवीन वर्ग
शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार तालुक्यातील १७ शाळांमध्ये आठवीचा नवीन वर्ग सुरु होणार आहे. यामध्ये पिंपळगाव (डोळा), करंजकल्ला, दाभा, लोहटा (प.), शेलगाव (ज), नागझरवाडी, वाघोली, वडगाव (ज), वडगाव (शि), सात्रा, गंभीरवाडी, आढळा, बाभळगाव, हिंगणगाव, पिंप्री (शि), रायगव्हाण शाळेचा समावेश आहे. (वार्ताहर)
विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार
तालुक्यात १७ शाळांमध्ये इयत्ता ५ वी तर २९ शाळांमध्ये ८ वीचा वर्ग नसल्याने येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी इतरत्र पायपीट करावी लागत होती. आता उपरोक्त गावामध्ये शिक्षणाची सोय होवून नवीन पाचवी व आठवीचे वर्ग सुरु होणार असल्याने स्थानिक ठिकाणी शिक्षणाची पुढील सोय होणार आहे. यामुळे या गावातील शेकडो विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
२९ शाळात पाचवीचे नवीन वर्ग
जिल्हा परिषदेच्या बरडवस्ती मंगरुळ, रामनगर, कोथळा, नानानगर दाभा, खडकी, काळदातेवस्ती, आवाड शिरपुरा, लासरा, क्रांतीनगर, शिराढोण, लमाणतांडा, शिराढोण, गिरीवस्ती वडगाव, हनुमानवस्ती, पिंप्री (शि), सिद्धेश्वरवस्ती (पाडोळी), बोरवंटी, दुधाळवाडी, बारातेवाडी, नाथवाडी, परतापूर, संजीतपूर, साखर कारखाना चोराखळी, अवधूतवाडी, माळीवस्ती गौर, हळदगाव, एरंडगाव, चौफुला भोगजी, उबाळेवस्ती सात्रा, गायरान वस्ती ईटकूर, धोत्रा वस्ती ईटकूर, साखर कारखाना हावरगाव, पारधी वस्ती आंदोरा, फरताडेवस्ती, मस्सा (खं) या २९ शाळांमध्ये नवीन पाचवीचे वर्ग सुरु होणार आहेत.
ताडगाव राहिले वंचित
तालुक्यातील ताडगाव येथे इयत्ता सातवीपर्यंत जि.प. ची शाळा आहे. याठिकाणी शिक्षक हक्क अधिनियमाच्या स्तरानुसार इयत्ता आठवीचा नवीन वर्ग निर्माण करणे आवश्यक होते. परंतु शिक्षण विभागाकडून दिलेल्या काही अपुऱ्या माहितीमुळे याठिकाणी नवीन आठवीच्या वर्गास मान्यता मिळालेली नाही. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, याठिकाणी शासनाच्या निकषानुसार आठवीच्या वर्गास मान्यता द्यावी, अशी मागणी सरपंच तथा युवा सेनेचे तालुकाप्रमुख बालाजी जाधवर यांनी केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचेही बालाजी जाधवर यांनी सांगितले.