दुहेरी उधळपट्टी..!
By Admin | Updated: March 26, 2015 00:56 IST2015-03-26T00:54:06+5:302015-03-26T00:56:00+5:30
उस्मानाबाद : उर्दू शाळांवर जागा रिक्त आहेत...शिक्षकही अतिरिक्त आहेत...अंतरजिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी असतानाही जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक वर्ष सरत आले

दुहेरी उधळपट्टी..!
उस्मानाबाद : उर्दू शाळांवर जागा रिक्त आहेत...शिक्षकही अतिरिक्त आहेत...अंतरजिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही मोठी असतानाही जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक वर्ष सरत आले तरी तोडगा निघालेला नाही. याऊलट संबंधित शाळांवर तासिका तत्वावर शिक्षक घेण्यात आले आहेत. त्यामुळे एकीकडून अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनावरही खर्च होत आहे. आणि दुसरीकडे तासिका तत्वावरील शिक्षकांवरही ‘झेडपी’च्या तिजोरीतून खर्च सुरू आहे. विशेष म्हणजे यानंतरही विद्यार्थ्यांना नियमित शिक्षक मिळालले नसल्याने संबंधित शाळांचा पट झपाट्याने खालावत आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उर्दू माध्यमाच्या बोटावर मोजण्याइतपतच शाळा आहेत. मात्र मागील एक ते दीड वर्षापासून शाळांना रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. माणकेश्वर, बेंबळी यासह इतर शाळांवरील मिळून शिक्षकांची २३ पदे रिक्त आहेत. तर खाजगी शाळांवरील १४ शिक्षक अतिरिक्त आहेत. तर दुसरीकडे आंतरजिल्हा बदलीने येवू इच्छिणाऱ्यांची संख्या २२ इतकी आहे. शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय आंतरजिल्हा बदलीने शिक्षक घेता येत नाहीत. असे असतानाही खाजगी शाळांवरील शिक्षकांचे अद्याप समायोजन होवू शकलेले नाही. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी अतिरिक्त शिक्षक असतानाही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना तासिका तत्वावरील गुरुजींकडून शिक्षणाचे धडे गिरविण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, रिक्त जागा भरण्याबाबत अनेकवेळा शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये शाळा भरविल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेतही हा विषय सातत्याने चर्चिला गेला. मात्र यातून काही साध्य झालेले नाही. अख्खे शैक्षणिक वर्ष सरत आले तरीही संबंधित शाळांना नियमित शिक्षक मिळू शकलेले नाहीत.
माणकेश्वर येथील शाळेवर ८ पदे मंजूर आहेत. मात्र याठिकाणी नियमित आणि तासिका तत्वावरील मिळून १० शिक्षक कार्यरत आहेत. एकीकडे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांवर वेतनापोटी शासनाच्या तिजोरीतून खर्च होत असताना दुसरीकडे संबंधित गुरुजींना नियुक्ती देण्याऐवजी जिल्हा परिषदेकडून संबंधित शाळांवर तासिका तत्वावर शिक्षक नेमले आहेत. त्यामुळे याठिकाणी दुहेरी उधळपट्टी होवूनही पाल्यांना चांगले शिक्षण मिळेल याची पालकांना खात्री नाही. त्यामुळेच पटसंख्या वाढण्याऐवजी वर्षागणिक कमी होऊ लागली आहे. प्रशासक आणि पदाधिकाऱ्यांच्या गोंधळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सभागृहातील चर्चा निष्फळ
४जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा, शिक्षण विषय समितीच्या अनेक बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला. मात्र काही पदाधिकाऱ्यांकडून खाजगी शाळावरील शिक्षक जि.प. शाळांमध्ये सामावून घेण्यास विरोध झाला होता. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे ठरले होते. तशी कार्यवाहीही करण्यात आली. मात्र याबाबतीत कुठलाच ठोस निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे सभागृहामध्ये वेळोवेळी झालेली चर्चा निष्फळ ठरली आहे. याबाबतीत गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तरी तोडगा काढून उर्दू शाळांना नियमित शिक्षक द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
जिल्हाभरातून उर्दू शाळावरील शिक्षकांची रिक्त पदे लक्षात घेता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून तासिका तत्वावर शिक्षक नेमले आहेत. खाजगी शाळा व आंतरजिल्हा बदलीने येणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झाल्यानंतर तातडीने संबंधित शाळांना नियमित शिक्षक देण्यात येतील, असे प्रभारी शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांनी सांगितले.