भांडखोर पत्नी नको रे बाबा... उलट्या प्रदक्षिणा मारत देवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:26 IST2021-06-23T19:19:37+5:302021-06-23T19:26:10+5:30

करोडी येथील पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा मारत पत्नी पीडितांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली

Don't want a quarrelsome wife, deamand of mens by reverse round to Peepal tree | भांडखोर पत्नी नको रे बाबा... उलट्या प्रदक्षिणा मारत देवाला साकडे

भांडखोर पत्नी नको रे बाबा... उलट्या प्रदक्षिणा मारत देवाला साकडे

ठळक मुद्देमुंबई-नागपूर महामार्गावरील करोडी येथे पाच वर्षांपूर्वी अ‍ॅड. भारत फुलारे यांनी पत्नी पीडितांसाठी आश्रम सुरू केला आहे.पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी

वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : कौटुंबिक कलहामुळे संसार उघड्यावर पडलेल्या पत्नी पीडित पुरुषांनी बुधवारी करोडीच्या आश्रमात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात आले. यावेळी पत्नी पीडितांनी पिंपळाच्या झाडाला उलट्या प्रदक्षिणा मारत ‘भांडखोर पत्नी नको रे बाबा’ असा नारा देत देवाला साकडे घातले.

मुंबई-नागपूर महामार्गावरील करोडी येथे पाच वर्षांपूर्वी अ‍ॅड. भारत फुलारे यांनी पत्नी पीडितांसाठी आश्रम सुरू केला आहे. या आश्रमात पत्नी पीडित पुरुषांना आश्रय देऊन त्यांना कायदेशीर सल्ला देऊन त्यांचे समुपदेशन करण्यात येते. आजघडीला राज्यभरातील ९ हजार पत्नी पीडित या आश्रमाचे सभासद झालेले आहेत. या पत्नी पीडितांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आश्रमाचे संस्थापक अ‍ॅड. भारत फुलारे यांच्या वतीने विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. काही महिला कायद्याचा आधार घेत खोट्या तक्रारी करून पती व त्यांच्या कुटुंबीयांस त्रास देत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, असा या पत्नी पीडितांचा आक्षेप आहे. महिलांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याचा काही महिला दुरुपयोग करून पतीला अडविण्यासाठी या कायद्याचा वापर केला जात असल्याचा आरोप पत्नी पीडितांनी केला आहे. पत्नीच्या छळामुळे एकाकी पडलेल्या पत्नी पीडित पुरुषांचे या आश्रमात समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार दिला जातो. याचबरोबर न्यायालयात खटला सुरू असताना वकील न लावता आपली बाजू आपण न्यायालयात कशी मांडावी, याविषयी कायदेशीर मार्गदर्शनही करण्यात येते.

पाच वर्षांपासून उपक्रम
पत्नीच्या छळामुळे त्रस्त झालेल्या पत्नी पीडितांकडून दरवर्षी वटसावित्री पौर्णिमेच्या आदल्या दिवशी करोडीच्या आश्रमात पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. गत पाच वर्षांपासून पिंपळ पौर्णिमा साजरी केली जात आहे. बुधवारी साजरी करण्यात आलेल्या पिंपळ पौर्णिमेत अ‍ॅड. भारत फुलारे, अ‍ॅड. दासोपंत दहिफळे, वैभव घोळवे, भिकन चंदन, जगदीश शिंदे आदींसह १५ पत्नी पीडितांनी सहभाग घेतला होता. यावेळी पत्नी पीडित पुजारी चरणसिंग घुसिंगे यांनी मंत्रोच्चार करीत पिंपळाच्या झाडाची पूजा करीत ‘पत्नीला सुबुद्धी देवो, यासाठी मनोभावे प्रार्थना केली.

पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करा
शासनाच्या वतीने महिलांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत; मात्र पुरुषांसाठी कायदे नसल्यामुळे त्यांना अन्याय, अत्याचार सहन करावा लागतो. महिलांप्रमाणेच पुरुषांना कायद्याचे संरक्षण मिळावे, यासाठी पत्नी पीडितांकडून शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. पुरुषांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करून पत्नीच्या छळापासून सुटका व्हावी, यासाठी कायदेशीर मार्गाने लढा सुरूच ठेवणार असल्याचे अ‍ॅड. भारत फुलारे यांनी सांगितले.

Web Title: Don't want a quarrelsome wife, deamand of mens by reverse round to Peepal tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.