लोक काय म्हणतील म्हणून प्रश्न वाढवू नका; मनोविकार नकोय, मग व्यक्त व्हा, मुक्त रहा

By संतोष हिरेमठ | Published: October 10, 2023 01:58 PM2023-10-10T13:58:13+5:302023-10-10T13:58:52+5:30

जागतिक मानसिक आरोग्य दिन: वाढती स्पर्धा, ताणतणावासह अनेक कारणांनी वाढताहेत मानसिक आजार

Don't raise questions because of what people will say; Don't be psychotic, then express yourself, be free | लोक काय म्हणतील म्हणून प्रश्न वाढवू नका; मनोविकार नकोय, मग व्यक्त व्हा, मुक्त रहा

लोक काय म्हणतील म्हणून प्रश्न वाढवू नका; मनोविकार नकोय, मग व्यक्त व्हा, मुक्त रहा

छत्रपती संभाजीनगर : वाढती स्पर्धा, ताणतणाव, मानसिक आघात, व्यसनाधीनता, मेंदूमधील होणारे सूक्ष्म बदल व रसायने यातील असमतोल यासह अनेक कारणांनी मानसिक आजार वाढत आहे.

प्रत्येक चार व्यक्तींमागे एका व्यक्तीला मानसिक आजार असतो. मात्र, थोडी काळजी घेतली तर या आजारांपासून दूर राहता येते, असे तज्ज्ञांनी म्हटले.दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाची यंदा ‘मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवी हक्क आहे’ ही संकल्पना आहे. घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागप्रमुख डाॅ. प्रसाद देशपांडे म्हणाले, मानसिक स्वास्थ्य हा प्रत्येक मनुष्याचा अधिकार आहे आणि तो अबाधित राहण्याला महत्त्व दिले पाहिजे. वेळीच सांगा, काहीतरी ठिक नाही, लोक काय म्हणतील म्हणून आतल्या आत त्रास करून प्रश्न वाढवत बसण्यात काय अर्थ आहे? व्यक्त व्हा आणि मुक्त रहावे. मनोविकारतज्ज्ञ डाॅ. सना खिलजी म्हणाले, डोकेदुखी, झोप न येणे, चिडचिड होणे, घबराट, बेचैनी होणे, उदासीनता हीदेखील मानसिक आजाराची लक्षणे आहेत. यावर वेळीच उपचार घेतला पाहिजे. ताणतणाव कमी करावा. जीवनशैलीत बदल करावा. यातून फायदा होतो.

मनोविकार वाटतो कलंक
मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता आणि समज नसल्यामुळे मनोविकार कलंक वाटू शकतो. यातूनच एखाद्या व्यक्तीला मानसिक आरोग्याच्या समस्येमुळे अन्यायकारक वागणूक दिली जाते. मात्र, गरज असताना जितक्या लवकर मदत आणि समर्थन मिळेल, तितके मानसिक आरोग्यासाठी चांगले राहते.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

मनोविकारांत वाढ
बदलती जीवनशैली, वाढती स्पर्धा व भौतिकवाद यामुळे वाढलेल्या ताणतणावाची परिणीती मनोविकारांचे प्रमाण वाढण्यात झाली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीपासून दूर गेलेल्या मनुष्याला ताणतणावाला एकट्यानेच तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे तो मनोविकाराला बळी पडत आहे. याचबरोबर मनोविकृतीशास्त्रात झालेल्या जलद व आमूलाग्र बदलामुळे मनोरुग्णांच्या जीवनात आशेचा किरण डोकावत आहे.
- डाॅ. आनंद काळे, मनोविकारतज्ज्ञ

अट्टाहास नको
मानसिक आरोग्य व्यवस्थापन सद्यस्थितीत अत्यंत महत्त्वाचे आहे. घटना, लोक आपल्या नियंत्रणात असल्या पाहिजेत, हा अट्टाहास नको. मानसिक आरोग्यासाठी शारीरिक श्रम आवश्यक आहे. गरजेप्रसंगी वेळीच समुपदेशन घेणे, मदत घेणे महत्त्वाचे ठरते.
- डाॅ. संदीप सिसोदे, समुपदेशक

Web Title: Don't raise questions because of what people will say; Don't be psychotic, then express yourself, be free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.