विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्र्यांचा मुक्त संचार...
By Admin | Updated: August 6, 2015 01:03 IST2015-08-06T00:32:08+5:302015-08-06T01:03:22+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उड्डाण घेत असताना मोकाट कुत्रे येत आहेत.

विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्र्यांचा मुक्त संचार...
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उड्डाण
घेत असताना मोकाट कुत्रे येत आहेत. विमानतळाच्या परिसरात मांसाहारी पदार्थ टाकण्याचे प्रमाण वाढल्याने पक्ष्यांचा त्रासही वाढला आहे. विमानतळाच्या भिंतीला लागूनच नागरिकांनी अनधिकृत घरे उभारल्याची खळबळजनक बाब बुधवारी विमानतळ अधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनासमोर मांडली.
बुधवारी सकाळी विमानतळावर पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आदी विभागांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, प्रशासकीय अधिकारी शिवाजी झनझन आदी उपस्थित होते. यावेळी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. विमानतळाला चारही बाजूने सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे.
नागरिक ही सुरक्षा भिंत अधूनमधून तोडून टाकतात. शालेय विद्यार्थी, नागरिक विमानतळ परिसरातून राजरोसपणे ये-जा करतात. मागील काही दिवसांपासून विमानतळाच्या धावपट्टीवर मोकाट कुत्र्यांचा संचारही वाढला आहे. विमान लॅन्ड करताना आणि टे आॅफ करताना हे मोकाट कुत्रे अडसर ठरत आहेत. विमानतळाच्या भिंतीला लागून मांसाहरी पदार्थ टाकण्यात येतात. त्यामुळे कावळे व इतर पक्षी मुक्तपणे हवेत संचार करीत असतात. विमानाच्या पंख्यात पक्षी अडकल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. कुत्रे मध्ये आल्यास विमान कोसळण्याची भीतीही असते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा गंभीर बाबी घडायला नकोत असेही विमानतळ प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. यापूर्वीही अनेकदा विमानतळ प्राधिकरणाने मनपाकडे यासंदर्भात लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत.