‘त्या’ अभियंत्यांची कागदपत्रे गायब
By Admin | Updated: January 14, 2015 00:55 IST2015-01-14T00:29:29+5:302015-01-14T00:55:36+5:30
जालना : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही कार्यालयांमधील अंदाधुंद कारभाराच्या चौकशीसाठी आलेल्या मंत्रालय स्तरावरील उच्चस्तरीय

‘त्या’ अभियंत्यांची कागदपत्रे गायब
जालना : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन्ही कार्यालयांमधील अंदाधुंद कारभाराच्या चौकशीसाठी आलेल्या मंत्रालय स्तरावरील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत दोन कार्यकारी अभियंता व एक प्रभारी कार्यकारी अभियंत्यांच्या काळातील कागदपत्रे गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा अहवाल समितीने शासनाकडे पाठविला आहे.
येथील बांधकाम खात्याच्या दोन्हीही विभागाने गेल्या चार-सहा वर्षात केलेल्या प्रचंड अनागोंदी कारभाराबाबत ‘लोकमत’ ने मालिकेद्वारे प्रकाशझोत टाकला होता. जालना ते भोकरदन या राज्य मार्गाच्या भयावह अवस्थेबाबत विदारक असे चित्र परखडपणे मांडले होते. काही लेखा शीर्षाखाली मर्यादेपेक्षा दिलेल्या कामांच्या मंजुरीसह वितरीत केलेल्या कोट्यवधी रूपयांच्या देयकांचे किस्से सुद्धा विषद केले होते. अवघ्या चार वर्षात देखभाल, दुरूस्तीच्या नावाखाली भोकरदन रस्त्यावरील अवघ्या १० कि़मी. वर केलेल्या ६३ कोटी रुपयांची उधळपट्टीही समोर आणली होती.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी या मालिकेची तातडीने दखल घेतली. पाठोपाठ चौकशीचे आदेश बजावले होते. मंत्रालयातून दिलेल्या आदेशाप्रमाणे दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह १६ जणांचे हे पथक मागील मंगळवारी जालन्यात दाखल झाले होते.
या सदस्यांनी अनेक कागदपत्रांची तपासणी केली. परंतु त्यात तीन अधिकाऱ्यांच्या काळातील कागदपत्रे त्यांना आढळून आली नाहीत. याप्रकरणीचा अहवाल तात्काळ बांधकाम खात्याच्या सचिवांना सादर करण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.