जगदीश भराडच्या मारेकऱ्याचा शोध लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:55 IST2019-02-28T20:54:39+5:302019-02-28T20:55:24+5:30
चार दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील कामगार जगदीश भराडचा मारेकरी सोमेश विधाटे याला शोधण्यात पोलिसांना अद्यापर्यंत यश आले नाही.

जगदीश भराडच्या मारेकऱ्याचा शोध लागेना
वाळूज महानगर : चार दिवसांपूर्वी वाळूज एमआयडीसीतील कामगार जगदीश भराडचा मारेकरी सोमेश विधाटे याला शोधण्यात पोलिसांना अद्यापर्यंत यश आले नाही. त्याच्या शोधासाठी गेलेली तीन्ही पथके रिकाम्या हाताने परतल्याने पोलीस तपासाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरींग या कंपनीचे मालक दीपक भराड यांचा चुलत भाऊ जगदीश भराड हा या कंपनी काम करीत होता. शनिवारी रात्री आरोपी सोमेश विधाटे याने त्याचा निर्घृण खून केला होता. घटनेनंतर सोमेश हा फरार झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या रात्री कामावर असलेल्या कामगाराचे जाब-जबाव घेऊन आरोपी सोमेश याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सुरुवातील पोलिसांनी सोमेश याच्या मूळगावी जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो घरीही मिळून न आल्याने पोलिसांनी त्यांच्या आई-वडील व नातेवाईकांकडून त्याचा ठाव-ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर सोमेश हा घरी आलाच नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सोमेश मोबाईल वापरत नसल्याने ठावठिकाणा शोधणे आव्हान बनले आहे.
पथकाने शिर्डी, फुलंब्री, वैजापूर, धोंदलगाव, खुलताबाद, वाळूज एमआयडीसी व इतर ठिकाणी त्याचा शोध घेतला.मात्र, तो मिळून आला नाही. त्यामुळे तीनही पथके बुधवारी परतली आहेत. त्याच्या शोधासाठी डीबीचे पथक गुरुवारी रवाना झाल्याचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, उपनिरीक्षक डी.बी.कोपनर यांनी सांगितले.