असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा...
By Admin | Updated: February 8, 2016 00:15 IST2016-02-08T00:06:15+5:302016-02-08T00:15:13+5:30
उस्मानाबाद : अंधाराच्या वारसांनो एक ध्यानामध्ये ठेवा, असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा ।।

असे मोहरे हेरून नाही विझणार दिवा...
उस्मानाबाद :
अंधाराच्या वारसांनो
एक ध्यानामध्ये ठेवा,
असे मोहरे हेरून
नाही विझणार दिवा ।।
तुम्ही मारलात गांधी,
पानसरे, दाभोळकर
पिस्तुलाच्या धाकावर
त्यांनी शिवार घेरलं ।।
येथील बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीमधील मुनेरबी शेख साहित्य मंचावर विविध विषय, प्रश्नांवर प्रकाश टाकणाऱ्या कवितांनी रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सलग दोन तास चाललेल्या या कविसंमेलनाला उपस्थित असलेल्या रसिकांनीही मोठी दाद दिली.
शनिवारी रात्री आठ वाजता औरंगाबाद येथील कवयित्री रसिका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित महिलांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या एकाहून एक सरस कवितांनी उपस्थितांच्या काळजाचा ताबा मिळविला. उस्मानाबाद येथील कवयित्री भाग्यश्री वाघमारे यांनी सादर केलेल्या कवितेमुळे उभे सभागृह गंभीर बनले.
भेगाळली भुई खोल,
अन् अंधारून आलं ,
पिस्तुलाच्या धाकावर,
त्यांनी शिवार घेरलं ,,
या कवितेच्या माध्यमातून देशात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवर सूचक भाष्य केले. लातूर येथील कवयित्री शैलजा कारंडे यांनी सादर केलेल्या कवितेला स्त्रीयांनी मोठा प्रतिसाद दिला.
साखर नको की, तूप नको,
दूध नको की, साय ।
क्षणभरासाठी का होईना,
हो ना माझी माय ।।
अशा ओळीत कारंडे यांनी ममतेसाठी आसूसलेल्या भावूक मनाची व्यथा सर्वांसमोर मांडली. नयन राजमाने यांनी सादर केलेल्या ‘निर्भिड अंधार’ या कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. विनीता कुलकर्णी-पाटील यांच्या गझलनेही उपस्थितांची वाहवा मिळविली.
वेदना माज्या उराचे
दार ठोठावून येते,
रोज एखाद्या सुखाला
संगती घेवून येते...
अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भाव प्रकट केला. माजलगाव येथून आलेल्या कवयित्री गौरी देशमुख यांनी शनिशिंगणापूर प्रकरणामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या विषयाला आपल्या कवितेतून वाट करून दिली.
सांगा शनिदेवा
आमचं काय चुकलं,
स्त्रीयांच्या दर्शनाने
मंदिर तुमचं बाटलं...
अशा परखड शब्दात त्यांनी या कवितेच्या माध्यमातून परंपरेच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाचा बुरखा फाडण्याचे काम केले. यांच्यासह अनेक कवयित्रींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून रसिकांना विचार करावयास भाग पाडले.
कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रेखा ढगे यांनी केले. कविसंमेलनाची सुरूवात संमेलनाध्यक्ष डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या काव्यवाचनाने झाली. यावेळी शहरासह परिसरातील रसिक-श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)