घाबरू नका, दक्षता घ्या !
By Admin | Updated: February 9, 2015 00:44 IST2015-02-09T00:42:50+5:302015-02-09T00:44:19+5:30
उस्मानाबाद : औरंगाबाद, लातूर नंतर उस्मानाबाद शहर, परंडा शहरात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आले आहेत़ संसर्गजन्य असलेल्या या आजारापासून बचाव करण्यासाठी

घाबरू नका, दक्षता घ्या !
उस्मानाबाद : औरंगाबाद, लातूर नंतर उस्मानाबाद शहर, परंडा शहरात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आले आहेत़ संसर्गजन्य असलेल्या या आजारापासून बचाव करण्यासाठी दक्षता हाच मोठा प्रतिबंध आहे़ जिल्हा रूग्णालय व जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़
मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर नंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात स्वाईन फ्लूने पाय पसरल्याचे दिसत आहे़ परंडा शहरातील एका २१ वर्षीय गरोदर महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले होते़ त्या महिलेची प्रसुती सोलापूर येथील रूग्णालयात झाली असून, बाळासह त्या महिलेवर सोलापूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उस्मानाबाद शहरातील राजीव गांधी नगर भागात राहणारे दत्ता चंदोबा त्रिमुखे यांना देखील सर्दी, ताप, खोकला आदीचा त्रास होत असल्याने त्यांना औरंगाबाद येथील सैनिकी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ तेथून ते शनिवारी उस्मानाबाद येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आले होते़ त्रिमुखे यांना स्वाईन फ्लू झाल्याचा संशय आल्याने डॉक्टरांनी त्यांना विशेष कक्षात दाखल करून घेतले आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ शिवाय जिल्हा रूग्णालयात विवधि ठिकाणाहून दररोज उपचारासाठी येणाऱ्या सर्दी, खोकला, तापीच्या रूग्णांची चौकशी करण्यात येत असल्याचे रूग्णालयीन सूत्रांनी सांगितले़
नागरिकांनी काळजी घ्यावी
स्वाईन फ्लू उपचाराने बरा होणारा आजार आहे़ या आजारावरील औषधांचा साठाही जिल्हा रूग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे़ सर्दी, खोकला, तापाची लागण झालेली लागण तीन-चार दिवसानंतरही कमी होत नसेल तर रूग्णालयाशी संपर्क साधून तपासणी करून घेण्याची आवश्यकता आहे़ जिल्हा रूग्णालयात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून, नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा रूग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी चंचला बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले़ (प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दररोज हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे एखादा जरी संशयित रुग्ण आढळला तरी त्यावर तातडीने उपचार सुरू करण्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून, औषधसाठाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. व्ही. होनमाने यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात खोकला, सर्दी, पडसे यांचे काही रुग्ण आढळले होते. त्यांची तपासणी करून स्वाईन फ्लूसदृश्य इतर कोणतीच लक्षणे आढळून आली नसल्याने योग्य उपचार करून त्यांना घरी पाठविल्याचेही त्यांनी सांगितले.
‘स्वाईन फ्लू’ संदर्भाने येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आपत्कालिन कक्षातून रविवारी शहरातील २१ रुग्णाची तपासणी करण्यात आली. यावेळी एक संशयित महिला रुग्ण आढळून आल्याने या महिलेवर उपजिल्हा रुग्णालयाच्या स्थापित कक्षातून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच सदर महिलेच्या कुटूंबातील सहा सदस्यांचीही तपासणी करून त्यांना प्रतिबंधात्मक औषधी देण्यात आली आहेत. यापुढेही स्वतंत्र स्थापन करण्यात आलेल्या कक्षामार्फत दररोज संशयित रूग्णाची तपासणी केली जाणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.