कायद्यांचा अभ्यास करुन व्यापार करा : राम भोगले
By Admin | Updated: August 18, 2014 00:32 IST2014-08-18T00:00:13+5:302014-08-18T00:32:42+5:30
परभणी : व्यापाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करुन व्यापार करावा, असे आवाहन महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्स ट्रेड इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांनी केले.

कायद्यांचा अभ्यास करुन व्यापार करा : राम भोगले
परभणी : सर्वच कायदे व्यापाऱ्यांच्या विरोधात आहेत, असे समजून चालणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करुन व्यापार करावा, असे आवाहन महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्स ट्रेड इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष राम भोगले यांनी केले.
मराठवाडा चेम्बर अॅण्ड ट्रेड कॉमर्सच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील अक्षदा मंगल कार्यालयात १७ आॅगस्ट रोजी मराठवाडा विभागीय व्यापारी परिषद घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन राम भोगले यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी मराठवाडा चेम्बर आॅफ ट्रेड अॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष कल्याणराव बरकसे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मानसिंह पवार, महाराष्ट्र चेम्बर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष समीर दुधगावकर, मराठवाडा चेम्बर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी, अर्थतज्ज्ञ अनिल बोकील, राज्यमंत्री फौजिया खान, खा.संजय जाधव, पोलिस अधीक्षक अनंतराव रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, उपाध्यक्ष नितीन वट्टमवार, सचिव सूर्यकांत हाके यांची उपस्थिती होती.
भोगले म्हणाले, व्यापारी वर्गाने कोणाकडे हात पसरुन आपले महत्त्व कमी करुन घेऊ नये. जो कर तुमच्या खिश्यातून जाणार नाही, तो चुकवायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कायद्याचा व्यवस्थित अभ्यास करुन आपला व्यापार सुरळीत करावा तसेच सर्वच कायदे व्यापाऱ्यांच्या विरोधात नाहीत. बदलत्या काळात बदलत्या व्यापाराचा, तंत्रज्ञानाचा वापर करुन व्यवसाय केल्यास तो वृद्धींगत होईल, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात राज्यमंत्री फौजिया खान, खा. बंडू जाधव, पोलिस अधीक्षक अनंतराव रोकडे, सत्यनारायण लाहोटी, समीर दुधगावकर यांचीही भाषणे झाली. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात मानसिंह पवार, सत्यनारायण लाहोटी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख वक्ते तथा अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी परभणी जिल्हा व्यापारी परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल यांचे स्वागतपर भाषण झाले. सूर्यकांत हाके यांनी प्रास्ताविकात व्यापाऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे, करांमध्ये सुटुसुटीतपणा आणा, राज्यसभा आणि विधानपरिषदेवर व्यापाऱ्यांचा प्रतिनिधीही घ्यावा, अशी मागणी केली.
या विभागीय व्यापारी परिषदेस मराठवाडा विभागातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)