डीएमआयसीअंतर्गत स्वतंत्र आयटी पार्क हवे
By Admin | Updated: August 21, 2014 00:13 IST2014-08-21T00:04:16+5:302014-08-21T00:13:06+5:30
नजीर शेख, औरंगाबाद औरंगाबाद शहराच्या परिसरात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक वसाहतीमध्ये आयटी (माहिती तंत्रज्ञान) पार्कसाठी जागा राखीव ठेवायला हवी, असे मत या प्रताप धोपटे यांनी व्यक्त केले.

डीएमआयसीअंतर्गत स्वतंत्र आयटी पार्क हवे
नजीर शेख, औरंगाबाद
औद्योगिक क्षेत्रात भरारी घेत असलेल्या औरंगाबाद शहराच्या परिसरात डीएमआयसीअंतर्गत औद्योगिक वसाहतीमध्ये आयटी (माहिती तंत्रज्ञान) पार्कसाठी जागा राखीव ठेवायला हवी, असे मत या क्षेत्रातील जाणकार प्रताप धोपटे यांनी व्यक्त केले.
‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात प्रताप धोपटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी देशातील आणि राज्यातील आयटी इंडस्ट्रीजचा आढावा घेतला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती होण्याची क्षमता औरंगाबादमध्ये आहे. इथे आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि जागा मिळू शकते. विविध महाविद्यालये आहेत. डीएमआयसीमुळे वसाहती वाढून शिक्षणाचे क्षेत्र विस्तारणार आहे. यामुळे आयटीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध होऊ शकतात. सद्य:स्थितीचा विचार केल्यास आपल्याकडे आयटीच्या चार-पाच कंपन्या आहेत. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क आहे. काही कंपन्या तेथे आपापल्या परीने वाढीचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोठ्या कंपन्या आल्याशिवाय औरंगाबादमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा विस्तार होणार नाही. अर्थात, हा विस्तार आपल्याला करावयाचा असेल तर जाणीवपूर्वक काही प्रयत्न करण्याची गरज आहे.
डीएमआयसीअंतर्गत नव्याने शेंद्रा, करमाड, बिडकीन भागात औद्योगिक वसाहती निर्माण होणार आहेत. या परिसरात आयटी पार्कसाठी जागा राखीव असावी, जेणेकरून ती जागा आयटी क्षेत्रातील कंपन्यांनाच देता येईल. सध्या आपल्या राज्याचा विचार करता मुंबई, पुणे आणि काही प्रमाणात नागपूर याठिकाणी आयटी क्षेत्र विकसित होत आहे.
एकट्या टाटा कन्सल्टन्सीचा विचार केला तर ही कंपनी भुवनेश्वर, थिरुवनंतपुरम, कोची यासारख्या शहरात गेली. आपल्या राज्यात नागपूर येथेही कंपनीचे कार्यालय आहे. आपण तर मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहोत. आपल्याकडे पुणे- औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण आहे. एअर कनेक्टिव्हिटी आहे. याचा फायदा मिळायला हवा. आयटी पार्कमध्ये कंपन्यांना स्वस्तात जागा मिळायला हवी. याठिकाणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना स्थान मिळाले पाहिजे. अन्यथा माहिती तंत्रज्ञानाशी साधर्म्य असलेली नावे धारण करून काही कंपन्या कमी दरातील जागा मिळवितात, असा अनुभव आहे. या सर्वांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच ते सहा नामांकित कंपन्या येथे आल्यास या भागात आयटीचा विस्तार होईल. त्यासाठी स्थानिक औद्योगिक संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. अशा कंपन्यांना काही प्रमाणात सवलती दिल्या गेल्या पाहिजेत.
डीएमआयसीमुळे या शहराचे नाव देशभरात चर्चिले जात आहे. त्याचा फायदा आपल्याला व्हायला हवा. येथे आयटी पार्क विकसित झाल्यास या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या स्थानिक तरुणांचे स्थलांतर होणार नाही. शिवाय हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षेत्रही विकसित होईल. यापुढे जाऊन सांगायचे झाल्यास येथे आयटी सेझ विकसित व्हायला पाहिजे. ते झाले तर उत्तमच; पण सद्य:स्थितीत आपण आयटी पार्क विकसित व्हावे, असा विचार करू या. आपल्याकडे वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे आॅटो क्लस्टर डेव्हलप झाले, त्याच धर्तीवर क्लस्टर पद्धतीनेही माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा विस्तार आणि विकास व्हायला पाहिजे, असे वाटते. मात्र, हे करण्यासाठी नामांकित कंपन्या जाणीवपूर्वक आणाव्या लागतील.