विद्यापीठात डी.लिट.ची प्रक्रिया ‘डिलीट’?

By Admin | Updated: July 22, 2014 00:49 IST2014-07-22T00:41:34+5:302014-07-22T00:49:32+5:30

विजय सरवदे , औरंगाबाद विद्यापीठाला केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मानद डॉक्टरेट पदवीने (डी. लिट.) सन्मानित करण्यासाठी एकही कर्तृत्वान व्यक्ती सापडत नसावी.

D.Lit's process 'delete' in university? | विद्यापीठात डी.लिट.ची प्रक्रिया ‘डिलीट’?

विद्यापीठात डी.लिट.ची प्रक्रिया ‘डिलीट’?

विजय सरवदे , औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मानद डॉक्टरेट पदवीने (डी. लिट.) सन्मानित करण्यासाठी एकही कर्तृत्वान व्यक्ती सापडत नसावी. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून विद्यापीठाने एकालाही ‘डी. लिट.’ पदवी दिलेली नाही, हे विशेष!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना १९५८ मध्ये झाली. त्यानंतर १९७० पासून विद्यापीठाने राजकीय, सामाजिक, साहित्यिक, विज्ञान, कृषी, अशा प्रकारे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्याची प्रथा अवलंबिली. ‘डी. लिट.’ देण्याची ही परंपरा २०१० पर्यंत चालली; अलीकडच्या सलग चार वर्षांत विद्यापीठाला राज्यात कुठेही कर्तृत्वान व्यक्ती सापडला नसावा अथवा अधिसभा (सिनेट) सदस्यांना या पदवीचा विसर पडलेला असावा, असे दिसते.
यांना मिळाली डी. लिट.
विद्यापीठाने पहिली ‘डी. लिट.’ पदवी ही संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिली. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, के. एन. सेठना, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, मामासाहेब जगदाळे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सनई वादक बिस्मिल्ला खान, अण्णासाहेब गुंजकर, माधवराव बागल, देवीसिंह चौहान, सेतू माधवराव पगडी, मिसाईल मॅन तथा माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, एन. डी. पाटील, बाबा आमटे, बद्रीनारायण बारवाले व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या १६ जणांना आतापर्यंत डी. लिट.ने सन्मानित करण्यात आलेले आहे.
अशी दिली जाते डी. लिट.
एखाद्या कर्तृत्वान व्यक्तीला डी. लिट. पदवी द्यावी, असा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीसमोर चर्चेसाठी ठेवला जातो. बैठकीत त्यावर चर्चा होऊन तो मान्य झाल्यास राज्यपालांच्या मान्यतेसाठी तो प्रस्ताव पाठविला जातो. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर सन्मानाने विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलावले जाते.
या समारंभात त्याला ‘डी. लिट.’ पदवी देऊन त्याचा व त्याच्या कार्याचा सन्मान केला जातो. २००३ मध्ये राज्यपाल कार्यालयात महाकवी वामनदादा कर्डक, स. मा. गर्गे व विजय भटकर या तिघा जणांचा प्रस्ताव पडून आहे. त्याचे पुढे काय झाले, याची माहिती घेण्याची तसदी तत्कालीन विद्यापीठ प्रशासन किंवा पदाधिकाऱ्यांनी घेतली नाही.
डी. लिट. ही मानद पदवी
विद्यापीठामार्फत दिली जाणारी डी.लिट. ही मानद पदवी आहे. ती कर्तृत्वान व्यक्तीला त्याच्या विशिष्ट समारंभाच्या निमित्ताने देण्याचा प्रघात आहे. मी बीसीयूडीचा पदभार घेतल्यापासून यासंबंधीचा एकही प्रस्ताव आलेला नाही, असे महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. सुरेशचंद्र झांबरे यांनी सांगितले.

Web Title: D.Lit's process 'delete' in university?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.