बजाजनगरात दिव्यांगाच्या जुळल्या रेशीम गाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:24+5:302021-01-08T04:08:24+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन वाळूज महानगराच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोन दिव्यांगाच्या रेशीमगाठी जुळवत त्यांचा ...

बजाजनगरात दिव्यांगाच्या जुळल्या रेशीम गाठी
वाळूज महानगर : बजाजनगरात प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन वाळूज महानगराच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत दोन दिव्यांगाच्या रेशीमगाठी जुळवत त्यांचा थाटामाटात विवाह लावून दिला.
वाळूज उद्योगनगरीत गणेश आहेर हे दोन्ही पायांनी अपंग असून डिजिटल बॅनर छापण्याच्या युनिटमध्ये काम करतात. विवाहाचे वय झाल्याने गणेश आहेर यांच्या नातेवाईक़ांनी त्यांच्यासाठी वधू शोधण्याचे काम सुरु केले होते. मात्र दोन्ही पायाने अपंग असल्याने विवाह जुळवण्यास अडचण येत होती. या प्रकाराची माहिती मिळताच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे जिल्हा संपर्क प्रमुख पारसचंद साकला, जिल्हासचिव जोतीराम जाधव, पश्चिम तालुकाध्यक्ष बद्रीनाथभाऊ लघाने, दत्ता वाकडे, किशोर फेगडे, सुभाष पाईकराव, शिवाजी दांगट आदींनी संघटनेच्या व्हॉटस ॲपग्रुपमधून वधूचा शोध घेतला. उस्मानाबादच्या दिव्यांग निर्मला भरगंडे यांनी गणेश आहेर यांच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शविली. वधू-वराकडील नातेवाईकांचा होकार मिळताच लग्नाची जुळवाजुळव करण्यात आली.
बजाजनगरातील गणपती मंदिरात रविवारी (३) गणेश आहेर व निर्मला भरगंडे यांचा विवाह थाटामाटात पार पडला.
फोटो ओळ- बजाजनगरातील गणपती मंदिरात दिव्यांग वधू-वरांना भेटवस्तू देताना प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनचे पदाधिकारी दिसत आहेत.
---------------------
बजाजनगरातून दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगरातील मोहटादेवी मंदिरजवळून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अक्षय हरिभाऊ लोखंडे (रा.सीतानगर, वडगाव) हे ३१ डिसेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीने ( एम.एच.१७, सी.के.९६६८) बजाजनगरात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. भाजीमंडई जवळ उभी केलेली ही दुचाकी चोरट्याने संधी साधून चोरुन नेली.
----------------------
वडगावात अभिवादन कार्यक्रम
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील आदित्य प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव तर प्रमुख पाहुणे इस्माईल पटेल उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका माधुरी देशमुख, पूजा चव्हाण, अनिल हासुळे, संदीप देशमुख, अशोक देशमुख, भास्कर सोनवणे, महादेव इंगोले आदींची उपस्थिती होती
--------------------------------