विभागीय आयुक्त भापकर झाले ‘काम अ‍ॅण्ड कूल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:12 IST2017-11-03T01:12:35+5:302017-11-03T01:12:40+5:30

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेले दिसत आहेत. त्यांच्या देहबोलीत बदल झाला आहे. नम्रपणे ते सर्वांचे ऐकून घेत आहेत

 Divisional Commissioner Bhapkar got 'peacefull and Cool' | विभागीय आयुक्त भापकर झाले ‘काम अ‍ॅण्ड कूल’

विभागीय आयुक्त भापकर झाले ‘काम अ‍ॅण्ड कूल’

विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘सिंघम स्टाइल’ काम करणारे म्हणून ते परिचित आहेत. अधिका-यांना आपल्या देहबोलीतूनच त्याची जागा दाखविणारे म्हणूनही त्यांची ख्याती आहे. प्रसंगी कठोर शब्द वापरून सहका-यांचा पानउतारादेखील ते करतात. बेधडक बोलणे आणि त्याच्या परिणामाची पर्वा न करणे असेदेखील त्यांचे वैैशिष्ट्य आहे. अशी अंगभूत वैशिष्ट्ये असलेले विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेले दिसत आहेत. त्यांच्या देहबोलीत बदल झाला आहे. नम्रपणे ते सर्वांचे ऐकून घेत आहेत. सहका-यांशी आणि भेटायला आलेल्या शिष्टमंडळाशी ते उत्तम संवाद साधत आहेत. ते ‘काम अ‍ॅण्ड कूल’ झाल्याचे विभागीय आयुक्तालयातील अधिकारी सांगत आहेत. त्यांच्यामधील या बदलाने आश्चर्य करण्याबरोबरच सर्वांच्या चेह-यावर प्रश्नचिन्हही दिसत आहे.
डॉ. भापकर यांच्या देहबोलीतील बदलाचे, वारंवार घेण्यात येत असलेल्या बैठकांमागचे रहस्य काय, याचे कोडे अनेकांना पडले आहे. मध्यंतरी डॉ. भापकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा समोर आली. या चर्चेत काही तथ्य आहे का, याचाही अंदाज अनेकजण त्यांच्या देहबोलीवरून लावत आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये विभागीय आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेतील कारभाराप्रमाणेच ते धडाक्यात सिंघम स्टाइलने मराठवाडा पातळीवर काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांच्या कार्यशैलीत अचानक एवढा बदल झाला आहे की, ते आता फक्त बैठकांवर बैठका घेत आहेत. ११ महिन्यांपासून प्रशासकीय आढावा घेण्यातच गुंतलेले डॉ. भापकर यांना खरेच लोकसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत आणि ते त्यादृष्टीने काम करीत आहेत का, असा सवाल अनेकांच्या मनात घोळ घालत आहे.
डॉ. भापकर यांच्या मनपातील सुमारे चार वर्षांच्या कार्यकाळात सुरुवातीची दोन वर्षे शांततेत गेली. परंतु २०१२ साली जानेवारी महिन्यात त्यांच्यावर सभागृहात सदस्यांनी निष्क्रियतेचा आरोप केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहरातील अतिक्रमणांवर ‘न भूतो न भविष्यती’ असा हातोडा चालवून रस्त्यांचा अतिक्रमणाने कोंडलेला श्वास मोकळा केला. गुलमंडी, कैलासनगर, सिल्लेखाना, एकनाथनगर, शहागंज या रस्त्यांवरील अतिक्रमणे काढून त्यांचे रुंदीकरण त्यांच्या कार्यकाळात झाले. नागरिक आणि माध्यमांनी त्यांना सिंघम अशी उपाधीही बहाल केली. पालिका प्रशासनातील अधिका-यांना सतत शिवराळ भाषेत बोलण्यावरून ते नेहमीच चर्चेत राहिले. त्यांच्या मनपाच्या कार्यकाळात बदल्या आणि निलंबनाने शतकोत्सव साजरा केला होता. अशा स्टाइलने काम करणारे डॉ.भापकर विभागीय आयुक्त म्हणून काम करताना अतिशय मितभाषी आणि शांत झाले आहेत. त्यांची देहबोली अचानक बदलली आहे.
बैठकींच्या सत्रांमुळे प्रशासनातील अधिकाºयांवर कामाचा ताण वाढला आहे. आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर खुलताबाद येथील कर्मचा-याचा अचानक मृत्यू झाला होता. त्या कर्मचाºयाच्या मृत्यूला जबाबदार असणाºया अधिका-यांप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीचे काहीही झाले नाही. शहरालगतच्या अनधिकृत ११ खदानींप्रकरणी त्यांच्याकडे तक्रारी गेल्या, त्याबाबत काहीही निर्णय झाला नाही. इनामी जमिनी प्रकरण विक्री प्रकरणात तेवढी चौकशी मात्र त्यांनी करून घेतली. कार्यशाळा घेऊन सीताफळ महोत्सवाची तहान भागविण्यात आली. औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरणाबाबतही त्यांनी बैठक घेतली. जनजागृतीवरही ते बैठकांमध्ये भर देत आहेत. त्यांच्या तोंडी ‘विकासा’ची भाषा आली आहे. त्यांच्या या नव्या कार्यशैलीमुळे त्यांच्या भविष्यातील कृतीविषयी अनेकजण अंदाज लावू लागले आहेत.

Web Title:  Divisional Commissioner Bhapkar got 'peacefull and Cool'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.