पैठण शहरात गढूळ पाणीपुरवठा; आजार वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:55 IST2017-08-06T23:55:16+5:302017-08-06T23:55:16+5:30
: पैठण शहराला शुध्द पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॉरिफायर ( फॅक्युलेटर ) टँकमध्ये जवळपास आठ फूट गाळाचा थर साचला असून यामुळे पैठण शहराला गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे.

पैठण शहरात गढूळ पाणीपुरवठा; आजार वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण शहराला शुध्द पाणीपुरवठा करणाºया जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॉरिफायर ( फॅक्युलेटर ) टँकमध्ये जवळपास आठ फूट गाळाचा थर साचला असून यामुळे पैठण शहराला गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकमधील गाळ काढण्याचे काम तीन दिवसांपासून सुरू असून आणखी काही दिवस गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे. काम सुरू असल्याने नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी केले आहे.
पैठण शहराला जायकवाडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रातील अनेक सयंत्रे जुनाट झाली आहेत. क्लॉरिफायर टँकची फिरती ब्रीज यंत्रणा गेल्या सहा वर्षांपासून बंद आहे. बेड वॉश जाम झाले आहेत. आलम (तुरटी) मिक्सर मोटार जाम झाली आहे. या परिस्थितीत ब्लिचिंग पावडर हाताने टाकण्यात येत असून आलम तुरटी मिसळण्यासाठी तात्पुरती यंत्रणा उभारून पाण्यात सोडण्यात येत आहे. या मुळे शहरवासियांना अशुद्ध पाणीपुरवठा सुरू आहे. अशुद्ध पाण्यामुळे विविध रोगाचा सामना नागरिकांना करावा लागत होता. याबाबत ओरड झाल्याने नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपनगराध्यक्ष सुचित्रा महेश जोशी, पाणीपुरवठा सभापती आशा आंधळे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने टँकमधील गाळ काढून दुरूस्ती करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाई सुरू आहे. जायकवाडी धरणातील जलवाहिनीतून पाणी जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते. पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया या शुद्धीकरण केंद्रात केली जाते. परंतु पाणी शुद्धीकरण केंद्रातील बरीच यंत्रणा बंद पडलेली आहे. तीन दिवसांपासून टँकमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तीन दिवसात टँकमधील ४ फूट गाळाचा थर काढण्यात आला आहे. आणखी दोन दिवस हे काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रात नगराध्यक्ष लोळगे यांनी पाहणी केली असता केंद्रातील कर्मचारी ठराविक अंतराने ब्लिचिंग पावडरची गोणी पाण्यात ओतत होता. हा प्रकार पाहून नगराध्यक्षांनी १०० लिटर पाण्यासाठी ५ ग्रॉम ब्लिचिंग पावडर याप्रमाणे गणित करून ब्लिचिंग पावडर टाका, असे आदेश दिले.