जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कडक तर इतर दिवशी अंशतः; लॉकडाऊनचा हाच पॅटर्न राहणार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 11:59 IST2021-03-15T11:57:28+5:302021-03-15T11:59:45+5:30
Lockdown in Aurangabad जिल्ह्यात दिनांक ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कडक तर इतर दिवशी अंशतः; लॉकडाऊनचा हाच पॅटर्न राहणार सुरु
औरंगाबाद : जिल्ह्यात लॉकडाऊनचा सध्या सुरू असलेलाच पॅटर्न कायम राहणार आहे. शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असेल. इतर दिवशी ५० टक्के क्षमतेवर ज्या क्षेत्राला परवानगी दिली आहे, ती सुरू राहतील. अभ्यासिकाही ५० टक्के क्षमतेवर सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्ह्यात दिनांक ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अंशत: लॉकडाऊनच्या काळात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत राहील. या काळात प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच सुरू राहणार आहेत. साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण सध्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे ११ मार्चपासून अंशत: लॉकडाऊन सुरू आहे.
अंशत: लॉकडाऊनमध्ये राजकीय सभा, धरणे, आंदोलने, मोर्चांवर बंदी आहे. सर्व आठवडा बाजार, जलतरण तलाव बंद असतील. क्रीडा स्पर्धा घेता येणार नाहीत. सरावासाठी परवानगी आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ ऑनलाईन सुरू राहतील. मंगल कार्यालय, सभागृहे, लॉन्स बंद राहणार असून, विवाह नोंदणी पद्धतीने करण्यात यावेत, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत.