जिल्ह्याला ८८ टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त

By Admin | Updated: June 16, 2014 00:12 IST2014-06-15T23:59:41+5:302014-06-16T00:12:50+5:30

त्र्यंबक वडसकर, परभणी विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. यावर्षी १६ जून रोजी शाळा सुरू होत असून, आतापर्यंत ८८ टक्के पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहेत.

The district receives 88 percent textbooks | जिल्ह्याला ८८ टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त

जिल्ह्याला ८८ टक्के पाठ्यपुस्तके प्राप्त

त्र्यंबक वडसकर, परभणी
विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. यावर्षी १६ जून रोजी शाळा सुरू होत असून, आतापर्यंत ८८ टक्के पुस्तके शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहेत. त्यामुळे यावर्षीदेखील शंभर टक्के विद्यार्थ्यांना पुस्तके मिळण्याची शक्यता नाही.
जिल्हा परिषद शाळांसह मनपा, नप, खाजगी आणि अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मोफत वाटप केली जातात. ही पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करावित, असे निर्देश आहेत. परंतु दरवर्षी जिल्ह्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा अपुरा केला जातो. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहतात. जि.प. च्या शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची जोरात तयारी केली.
सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून पुस्तके वाटप होतात. जिल्ह्यात उर्दू माध्यमाचे ३३ हजार २७५ आणि मराठी माध्यमाचे २ लाख ४७ हजार ४४५ असे एकूण २ लाख ८० हजार ७२० विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने १६ लाख १९ हजार ८७२ पुस्तकांची मागणी नोंदविली होती. १४ जूनपर्यंत या विभागाला १४ लाख २६ हजार १२३ (८८ टक्के) पुस्तके प्राप्त झाली. आणखी २ लाख २ हजार २७३ पुस्तके येणे बाकी आहे. मागील काही वर्षांपासून अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित रहात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यावर्षी पुस्तक वाटपाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला. पूर्वी जिल्ह्याच्या ठिकाणाहून पुस्तकांचे वाटप केले जात होते़ यावर्षीपासून प्रत्येक तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पुस्तकांचा पुरवठा केला असून तेथून शाळांना पुस्तके वितरित केली जात आहेत़
पहिली ते आठवीपर्यंतच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके वितरित केली जाणार आहेत़ ही पुस्तके जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी आणि अनुदानीत शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत़ परंतु, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ विनाअनुदानीत शाळेतील विद्यार्थ्यांना देखील ही पुस्तके मिळाली पाहिजे, अशी मागणी होत आहे़

शाळेचा पहिला दिवस
दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्या संपून १६ जून रोजी जिल्ह्यातील शैक्षणिक सत्र सुरू होत आहे़ सर्व शाळा आजपासून सुरू होत असल्याने शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनीही शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त तयारी केली आहे़ गणवेश, बुट, सॉक्स खरेदीसाठी रविवारी पालकांनी बाजारात गर्दी केली होती़ विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता.

Web Title: The district receives 88 percent textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.