जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा

By Admin | Updated: April 13, 2015 00:46 IST2015-04-13T00:37:47+5:302015-04-13T00:46:46+5:30

जालना : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावांना तडाखा दिला असून घरांवरील पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे यासह

The district is hit by the hail on the third day | जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा

जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही गारपिटीचा तडाखा


जालना : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावांना तडाखा दिला असून घरांवरील पत्रे उडून जाणे, भिंती कोसळणे यासह मोठ्या प्रमाणावर सीडस् कांदा व फळबागांचे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळनंतर झालेल्या या प्रकारामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत.
शुक्रवारपासून जिल्ह्यावर पुन्हा आस्मानी संकट कोसळले आहे. अगोदरच पूर्वीच्या गारपिटीची मदत वेळेवर न मिळाल्याने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना रविवारी सायंकाळी गारपिटीने तडाखा दिला.
जालना तालुक्यातील धारकल्याण येथे नारायण दाभाडे यांच्या शेतातील गोठ्यात बाभळीचे झाड पडल्याने एक गाय दगावली. तर बैल गंभीर जखमी झाला. या प्रकाराची माहिती कळताच तहसीलदार रेवननाथ लबडे, गटविकास अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नेर, खोडेपुरी, मोतीगव्हाण, निपाणी पोखरी, नसडगाव इत्यादी ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
भोकरदन तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. पारध, पारध खुर्द, राजूर, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, अवघडराव सावंगी, लिहा, सेलूद, हिसोडा, जळगाव सपकाळ, आन्वा, कल्याणी, करजगाव, वरूड बुद्रूक, पळसखेडा मुर्तड या गावांमध्ये सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात पिंपळगाव रेणुकाई परिसरात गारपिट झाली. यामध्ये कांदा सीडस्, फळबागा व पानमळ्यांचे मोठे नुकसान झाले. अंबड तालुक्यात मठपिंपळगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला.
जाफराबाद तालुक्यातील भारज, वरूड, खामखेडा, हिवरा काबली, गोंधनखेडा, भातडी, आळंद, टेंभूर्णी परिसरात पाऊस झाला. भारज परिसरात मोठ्या प्रमाणात गारपिटी झाल्याने शेतकऱ्यांचे कांदा सीडस् व फळबागांचे मोठे नुकसान झाले. गारांचा आकार बोराएवढा होता. त्यामुळे पानमळा व पपईच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.
मंठा तालुक्यात तळणी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यात जयपूर, चौफुली, बेलोरा, वैद्य वडगाव, वझर सरकटे, शिवनगिरी, नळणी, गारटेकी, दहिफळ खंदारे, नळडोह, नायगाव, देवठाणा, खोडवा, उस्वद या गावांच्या परिसरात ५. ३० ते ६ च्या दरम्यान, मोठ्या प्रमाणात गारपिट झाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब कोसळून ताराही तुटल्या. त्यामुळे काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील दोन दिवसांपूर्वीही झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. परतूर तालुक्यातील पाटोदा माव, आष्टी, पांडेपोखरी परिसरात सायंकाळी ४ च्या सुमारास १५ मिनिटे गारांचा पाऊस पडला. वादळी वाऱ्यामुळे परिसरातील काही घरांवरील पत्रे उडून गेली. फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, जांबसमर्थ, विरेगाव, विरेगाव तांडा, राजाटाकळी, गुंज, मूर्ती या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान, गारपिट झाली. गारांमुळे टरबुजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कांदा सीडस्, डाळिंब, केळीबाग, आंबा यांचे मोठे नुकसान झाले. (प्रतिनिधी)

Web Title: The district is hit by the hail on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.