दमदार पावसामुळे जिल्हा सुखावला
By Admin | Updated: September 10, 2015 00:30 IST2015-09-10T00:28:30+5:302015-09-10T00:30:49+5:30
उस्मानाबाद : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात सरासरी १०.८२ मिमी पावसाची नोंद झाली.

दमदार पावसामुळे जिल्हा सुखावला
उस्मानाबाद : मागील चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात सरासरी १०.८२ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारीही रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस झाल्याने चारा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत होणार आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांसह जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या ठिकाणीही चांगला पाणीसाठा झाला आहे.
जून महिन्यापासून जिल्हावासियांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. मात्र, दिवसेंदिवस कोरडे जात असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंताही वाढली होती. परतीच्या पावसाने मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात बरसण्यास सुरूवात केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. बुधवारी उस्मानाबाद तालुक्यात सरासरी ५.५० मिमी, तुळजापूर १.५७ मिमी, उमरगा ११.८०, लोहारा २२, कळंब १२, भूम ६.५०, वाशी १३ तर परंडा तालुक्यात १४.२० मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारीही पावसाचा जोर कायम होता. उस्मानाबाद शहरात दुपारपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता. पावसामुळे बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, तसेच शहरातील इतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शहरातून जाणारी भोगावती नदीही तुडूंब भरून वाहू लागल्याने शहरातील भूजल पातळी वाढण्यासही मोठी मदत होणार आहे. दरम्यान, उस्मानाबादसह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी चांगला पाऊस झाल्याचे वृत्त आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर, वाणेवाडी, पळसप, ढोकी, मुळेवाडी, किणी, वरूडा तसेच पवारवाडी परिसरात दमदार स्वरूपाचा पाऊस झाला. लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसरातही चांगला पाऊस झाला आहे. वाशी शहर व परिसरात रात्री साडेसातच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाली. तर कळंब तालुक्यातील नायगाव परिसरात दमदार पाऊस झाला असून, परंडा शहर व परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. तालुक्यातील लोहारा, वागेगव्हाण, कात्राबाद, सोनगिरी, भोत्रा, खानापूर, खासापुरी, बावची, रूई-दुधी आदी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. उमरगा तालुक्यातील गुंजोटी, मुरूम, बलसूर, बेडगा, डिग्गी, नारंगवाडी, येणेगूर, आष्टा आदी भागातही चांगला पाऊस झाला असून, या पावसाने तुळजापूर तालुक्यालाही मोठा दिलासा दिला आहे. तालुक्यातील सांगवी (काटी), माळुंब्रा, पांगरधरवाडी, तामलवाडी, सुरतगाव, सावरगाव (काटी), गोंधळवाडी आदी भागात सुमारे दोन तास दमदार पाऊस झाला आहे. उस्मानाबाद शहरात रात्री साडेनऊ नंतरही पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, या पावसाळ्यात बुधवारी सकाळपर्यंत उस्मानाबाद तालुक्यात २२१.५ मिमी पाऊस झाला असून, तुळजापूर २४४.८८, उमरगा २९१.४, लोहारा ३१८.६८, भूम १८३.२, कळंब २२०.५, परंडा २११.४ तर वाशी तालुक्यात २२०.३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६७ मिमी असून, बुधवारपर्यंत जिल्ह्यात सरासरी २३८.९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.