जिल्ह्यात १३ हजार क्विंटल तूर शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 23:50 IST2017-06-11T23:48:32+5:302017-06-11T23:50:08+5:30
परभणी : १० जूनपासून तूर खरेदी बंद झाल्याने १३ हजार क्विंटल तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे़

जिल्ह्यात १३ हजार क्विंटल तूर शिल्लक
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शासनाने आतापर्यंत परभणी जिल्ह्यामधून १ लाख ७२ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असली तरी १० जूनपासून तूर खरेदी बंद झाल्याने १३ हजार क्विंटल तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ खरेदीला मुदतवाढ मिळते की नाही? याविषयी साशंकता निर्माण झाल्याने तूर उत्पादक हवालदिल झाले आहेत़
परभणी, मानवत, गंगाखेड, जिंतूर आणि सेलू या पाच तालुक्यांमध्ये हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करून शासनाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला़ मात्र केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावरील गोंधळ सुरूच राहिला़ केंद्र शासनाच्या नाफेड या एजन्सीने आणि काही तूर राज्य शासनाने खरेदी केली आहे़ २७ डिसेंबर २०१६ रोजी खरेदी केंद्र सुरू झाले़ मात्र सुरुवातीला बारदान्याची टंचाई, त्यानंतर साठवणुकीचा प्रश्न आणि काटे कमी असल्याने खरेदी केंद्रावर गोंधळाची स्थिती पहावयास मिळाली़ या केंद्रावरील तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा शेवटपर्यंत कायम राहिल्या़ तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता १० जून रोजी जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केले आहेत़
हे केंद्र बंद झाल्यानंतरही गंगाखेड आणि परभणीच्या खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा कायम आहेत़ त्यामुळे या तुरीचे करायचे काय? असा प्रश्न उभा टाकला आहे़
जिल्ह्यातील पाचही केंद्रांवर १ लाख ७२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ जिल्ह्यामध्ये विक्रमी तूर उत्पादन झाले असून, शासनाने देखील तुरीची विक्रमी खरेदी केली आहे़ असे असले तरी अजून सुमारे १३ हजार क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे़ विशेष म्हणजे, केंद्र बंद होण्यापूर्वी ही वाहने केंद्रासमोर रांगेत उभी आहेत़ त्यामुळे या तुरीच्या खरेदीची जबाबदारी शासनाचीच असून, शासन आता या प्रश्नी काय निर्णय घते, याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे़