जिल्हा परिषद, जिल्हा कचेरीला अग्निशोधक यंत्रणेचे वावडे
By Admin | Updated: July 25, 2014 00:52 IST2014-07-25T00:52:00+5:302014-07-25T00:52:21+5:30
भास्कर लांडे , हिंगोली संपुर्ण जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुरेशी आग प्रतिबंधक यंत्रणाच उपलब्ध नाही.

जिल्हा परिषद, जिल्हा कचेरीला अग्निशोधक यंत्रणेचे वावडे
भास्कर लांडे , हिंगोली
संपुर्ण जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुरेशी आग प्रतिबंधक यंत्रणाच उपलब्ध नाही. उलट दोन्ही इमारतीतील शेकडो विभागासाठी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच ‘अग्नीरोधक कळ’ आढळून आले. दुसरीकडे या दोन्ही कार्यालयापेक्षा महावितरण आणि सामान्य रूग्णालय तुलनेने अक्षिक दक्ष असल्याचे पहावयास मिळले; परंतु अतिशय महत्वाच्या असणाऱ्या दोन्ही इमारतीत अकस्मातप्रसंगी लागलेली आग विझवण्यासाठी पुरेसे अग्नीरोधक देखील नसल्याची गंभीर व चिंताजणक बाब गुरूवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनअंती उघडकीस आली.
मुंबईतील ‘लोटस बिझनेस पार्क’ या इमारतीला लागलेल्या आगीत जवान नितीन इवलेकर शहीद झाले. पुरेशी आगप्रतिरोधक यंत्रणा नसल्यामुळे लागलेल्या आगीच्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात नाकारता येत नाही. मुंबई येथे मंत्रालयात लागलेली आगीची घटनाही प्रशासकीय यंत्रणा विसरलेली नाही. म्हणून त्याच धरतीवर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात आग प्रतिबंधक यंत्रणेची तपासणी २३ जुलै रोजी ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केली. सकाळी साडेअकरा वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयातील बहुतांश विभागात आणि वार्डात अग्नीरोधक कळ पहावयास मिळाली. रूग्णालयातील ११.३५ ते १२ वाजेपर्यंत बाह्यरूग्णविभाग, एक्सरे विभाग, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी विभाग, औषधी भांडार, प्रसुती विभाग, शिशू विहारात अग्नीरोधक उपलब्ध होते. शिवाय प्रत्येक वार्डच्या दरवाजाला किवा आतमध्ये अग्नीरोधक लावलेले आढळून आले. रूग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील टेलीमेडीसन विभागात १२ वाजता भिंतीला अग्नीरोधक ठेवल्याचे पहावयास मिळाले. रूग्णालयातील विभाग, रूग्ण, नागरिकांची संख्या पाहता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत १८ अग्नीरोधक बसविण्यात आल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम यांनी दिली. सामान्य रूग्णालयासारखे महावितरणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात अग्नीरोधक दिसून आले. दुपारी १२.१५ वाजता महावितरणच्या उपविभागाची पाहणी करण्यात आली. तिथे पिण्याच्या पाण्याच्या कुलरशेजारी १ अग्नीरोधक दृष्टीस पडले. याच कार्यालयातील भिंतीवर अन्य एक अग्नीरोधक दिसून आले. तद्नंतर मुख्य कार्यालयात अग्नीरोधकांची संख्या अर्धाडझनावर होती. शहर, ग्रामीण, फिरते पथक, अकाउंट विभागात देखील अग्नीरोधक उपलब्ध असल्याचे दिसून आले. दुपारी दीड वाजता आयटी सेंटरमध्ये भेट दिली असता तिथेदेखील अग्नीरोधक पहावयास मिळाले. त्यानंतर मुख्य अभियंता एच. के. रणदिवे यांनी मागील महिन्यातच ३० नवीन अग्नीरोधक बसविल्याचे सांगितले. दोन्ही विभागापेक्षा महत्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अग्नीरोधक यंत्रणेची नितांत गरज आहे. अतिशय महत्वाची कागदपत्रे, फाईल्स, येणाऱ्या लोकांची संख्या पाहता परिणामकार यंत्रणा गरजेची असताना येथे निष्काळजीपणा दिसून आला. दुपारी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच अग्नीरोधक कळ दिसून आले.
जिल्हा परिषदेत स्वतंत्र कर्मचारीच नाही
जिल्हा परिषदेत अग्नीरोधक विभाग तर नाहीच. उलट स्वतंत्र एकही कर्मचारी नेमण्यात आलेला नाही. जि.प.तील वरिष्ठ यांत्रिकी एम.एम. पांडे आणि कनिष्ठ यांत्रिकी दत्तात्रय खांडरे यांच्याकडून जि.प.तील या अग्नीरोधकाची देखभाल केली जाते. अग्नीरोधकावर असलेल्या मिटरवरून प्रेशर पाहून आतील गॅस भरून आणला जातो. जवळपास एका वर्षाला आतील गॅस भरल्या जात असल्याचे पांडे यांनी सांगितले.
हिंगोली नगरपालिकेत अपुरे मनुष्यबळ
हिंगोली नगरपालिकेतील अग्नीशमन यंत्रणा चांगली भूमिका बजावत आहे. पालिकेकडे ९ हजार लीटर पाण्याची क्षमता असणारी दोन वाहने उपलब्ध आहेत. २ वाहनासाठी २ वाहनचालक आणि २ कर्मचाऱ्यांना सर्व काम पहावे लागते. तब्बल ३ सहाय्यक प्रशिक्षकांच्या रिक्तपदांमुळे या कर्मचाऱ्यांना १२ तास कर्तव्यावर राहावे लागते. एका शिफ्टमधील कर्मचारी भरले नसल्याने कामाचा बोजा मोठा आहे. येथील विभागाने मागील वर्षी जवळपास ७ ठिकाणी आग विझविल्या आहेत. आता वसमत, कळमनुरीत अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध झाली आहे. औंढा, हिंगोली विभागात येत असून सेनगावातही अग्नीशमन विभाग आवश्यक असल्याचे कर्मचारी सुभाष आस्के यांनी सांगितले.
१४ वर्षांपासून अग्नीरोधक पाहिले नाही
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात अग्नीरोधक कळ ठेवण्यात आलेली नाही. महत्वाचा विभाग असताना देखील येथील अधिकाऱ्यांनी देखील मागणी केल्याचे दिसून येत नाही. गुरूवारी पाहणी केली असता आगीपासून सुरेक्षेची कोणतीही यंत्रणा दिसून आली नाही. येथील कर्मचाऱ्यास अग्नीरोधकाबाबत विचारले असता त्यांनी मागील १४ वर्षांपासून या अग्नीरोधकाला पाहिले नसल्याचे सांगितले.