निधीच्या विनियोगासाठी जि.प.त समन्वय समिती

By Admin | Updated: December 18, 2014 00:41 IST2014-12-17T23:42:10+5:302014-12-18T00:41:42+5:30

औरंगाबाद :विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली

District Co-ordination Committee for funds utilization | निधीच्या विनियोगासाठी जि.प.त समन्वय समिती

निधीच्या विनियोगासाठी जि.प.त समन्वय समिती

औरंगाबाद : जिल्हा परिषदेला सरकारकडून प्राप्त विकास निधीचा विनियोग निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण कामासाठी व्हावा, याचा पाठपुरावा करणे व त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांत सुसंवाद साधण्यासाठी ‘समन्वय समिती’ स्थापन करण्यात आली आहे. मुख्य वित्त व लेखाधिकारी या समितीच्या अध्यक्षपदी राहणार असून, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हे सदस्य सचिव राहणार आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, बांधकाम आदी विभागांची सर्व बांधकामे व दुरुस्तीची कामे बांधकाम विभागाला करावी लागतात; परंतु अनेकदा समन्वयाअभावी काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष होते व तो निधी अखर्चित राहतो. निधी अन्य एखाद्या विभागाचा असतो व तो बांधकाम विभागाला खर्च करावा लागतो; परंतु सदर कामाचे नियोजन व प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे काम त्या-त्या विभागाचे असते. त्यात दोन्ही विभागांत समन्वय नसला, तर कामांना विलंब होतो व पर्यायाने निधी लॅप्स होण्याचे प्रमाण वाढते.
यापुढे जिल्हा परिषदेला मिळणारी पै अन् पै निर्धारित वेळेत खर्च करण्याचा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण व सदस्य सचिव म्हणून बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची निवड केली आहे. शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. एम.एल. साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार हे समितीचे सदस्य आहेत.
या समितीची बैठक प्रत्येक महिन्याच्या सोमवारी कॅफोच्या दालनात होईल. समितीची पहिली बैठक दि.२२ डिसेंबर रोजी होणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.

Web Title: District Co-ordination Committee for funds utilization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.