जिल्हा व विभागीय व्यवस्थापकांची बदली
By Admin | Updated: May 15, 2015 00:50 IST2015-05-15T00:40:49+5:302015-05-15T00:50:05+5:30
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयांतर्गत २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज तसेच लाभार्थ्याच्या जातीत

जिल्हा व विभागीय व्यवस्थापकांची बदली
लातूर : वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयांतर्गत २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज तसेच लाभार्थ्याच्या जातीत आणि पत्यात घोळ झाल्याचे ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेनंतर उघडकीस आल्यानंतर लातूरच्या जिल्हा व विभागीय व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे़ जिल्हा व्यवस्थापकांची अकोल्याला तर विभागीय व्यवस्थापकांची नागपूरला बदली करण्यात आली आहे़ दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी या कर्जप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत़
वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या लातूर कार्यालयाने २००२ पासून २०१४ पर्यंत एकूण २५१ कर्जप्रकरणात एकाच व्यक्तीला दोनदा कर्ज दिले असून, जाती व पत्त्यात घोळ आहेत़ एकच लाभार्थी दोन गावचा रहिवाशी दर्शविला असून, त्याची जातही वेगवेगळी कर्जप्रस्तावात दर्शविली आहे़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करुन महामंडळाच्या कर्जप्रकरणाचा प्रश्न ऐरणीवर घेतला असता, जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत़ २० एप्रिल २०१५ रोजी चौकशीचे आदेश दिल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांना चौकशीसाठी बोलावले होते़ दरम्यान, महामंडळाच्या वरीष्ठ कार्यालयाने लातूरचे जिल्हा व्यवस्थापक पोपट झोंबाडे यांची अकोला येथे बदली केली असून, विभागीय व्यवस्थापक डी़जी़ जाधव यांना नागपूरचा रस्ता दाखविला आहे़ वसंतराव नाईक महामंडळाच्या बहुतांश कर्जप्रकरणात लाभार्थ्यांची जात, पत्ते, मंजूर धनादेश याबाबत संभ्रम आहे़ ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी २५१ कर्जप्रकरणात प्रकरणनिहाय चौकशी करण्याचे आदेश प्रादेशिक व्यवस्थापकांना दिले आहेत़ २० एप्रिलपासून या संदर्भात चौकशी सुरु आहे़ मात्र त्या बाबतचा अहवाल अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला नसला तरी महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाने मात्र स्थानिक व्यवस्थापक व विभागीय व्यवस्थापकांची बदली केली आहे़ त्यामुळे चौकशी पारदर्शी होईल, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)