दुष्काळावर जिल्हा प्रशासनाचे शिक्कामोर्तब

By Admin | Updated: December 16, 2015 23:34 IST2015-12-16T23:29:06+5:302015-12-16T23:34:59+5:30

परभणी : जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतीम आणेवारी जाहीर केली असून, ८४८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़

District administration seized on drought | दुष्काळावर जिल्हा प्रशासनाचे शिक्कामोर्तब

दुष्काळावर जिल्हा प्रशासनाचे शिक्कामोर्तब

परभणी : जिल्हा प्रशासनाने १५ डिसेंबर रोजी जिल्ह्याची अंतीम आणेवारी जाहीर केली असून, ८४८ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़ त्यामुळे एका अर्थी जिल्ह्याच्या दुष्काळावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे़
जिल्ह्यात ३ वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे़ पाऊस वेळेवर आणि पुरेसा होत नाही़ मागील दोन वर्षांत सरासरीच्या ५० टक्के पाऊसही झाला नाही़ पावसाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम हातचे गेले होते़ यावर्षी देखील तीच परिस्थिती आहे़ खरीप हंगाम हातचा गेला असून, रबी हंगामावर शेतकऱ्यांच्या आशा आहेत़ परंतु, परतीचा पाऊस झाला नसल्याने हा हंगामही धोक्यात आला आहे़
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे़ शेतांमध्ये पिके नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत अडकला आहे़ तर दुसरीकडे शेतीवर अवलंबून असणारी कामे ठप्प झाल्याने बेरोजगारीचा प्रश्न समोर आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातून शहरी भागाकडे मजुरांचा ओढा वाढत आहे़ सद्यस्थितीला ग्रामीण भागात सर्व व्यवहार ठप्प पडल्याचे पहावयास मिळत आहे़
जिल्हा प्रशासनातील महसूल विभागाच्या वतीने खरीप आणि रबी पिकांची आणेवारी काढून उत्पादनाचा आढावा घेतला जातो़ यात खरीप पिकांचे ठराविक प्लॉट पाडून उत्पादन मोजले जाते़ त्यावरून १०० च्या तुलनेत पैसेवारी काढली जाते़ सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हा प्रशासनाने नजर आणेवारी काढली़ त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली़ या दोन्ही वेळेस परभणी जिल्ह्यातील सर्व गावांची आणेवारी ५० पैशाच्या आत निघाली आहे़ त्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून शासनाने जाहीर केला आहे़ १५ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने अंतीम आणेवारी घोषित केली़ ही आणेवारी देखील ५० च्या आत आली आहे़ त्यामुळे परभणी जिल्हा हा दुष्काळग्रस्त असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे़ जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आणेवारीची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविली आहे़ (प्रतिनिधी)
८४८ गावांत : दुष्काळ परिस्थिती
जिल्ह्यात ८५२ गावे आहेत़ त्यापैकी परभणी तालुक्यातील बसला, सेलू तालुक्यातील करजखेडा, जिंतूर तालुक्यातील चौधरणी, लिंबाळा या चार गावांमध्ये कृषीक्षेत्र नसल्याने ८४८ गावांची आणेवारी काढण्यात आली़ त्यात सर्व गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी निघाली आहे़ परभणी तालुक्यातील १३१, गंगाखेड तालुक्यातमील १०६, पूर्णा ९५, पालम ८२, पाथरी ५८, मानवत ५४, सोनपेठ ६०, सेलू ९४ आणि जिंतूर तालुक्यातील १६८ गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली आहे़
समस्यांनी वेढला जिल्हा
पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ कृषी क्षेत्राला तर याचा फटका बसलाच आहे़ या शिवाय बेरोजगारी, पाणीटंचाई अशा समस्याही निर्माण झाल्या आहेत़ दिवसेंदिवस या समस्या गंभीर होत चालल्या असून, शासनाला प्राधान्याने आणि गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे दुष्काळाचा फटका परभणीच्या अर्थकारणावरही झाला आहे़ परभणी हा कृषीप्रधान जिल्हा असून, येथील अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे़ परंतु, शेतीला फटका बसल्याने आर्थिक उलाढाल ठप्प पडली आहे़ जिल्ह्याची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असून, दिवसेंदिवस ही समस्याही गंभीर होत आहे़

Web Title: District administration seized on drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.