लातूर : स्वस्त धान्य दुकानाचे अभिलेखे तपासणीला उपलब्ध करून न देणे, मयत लाभार्थ्यांच्या नातेवाईकास परस्पर स्वत:च्या अधिकारात धान्य वितरण करणे, शिवाय धान्य जादा दराने विक्री केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील पाच स्वस्त धान्य दुकानांवर जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी कारवाई केली असून, दोन दुकानांचा परवाना निलंबित केला असून, दोघांवर दंडात्मक तर एका दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील होसूर येथील मल्हारी मारोती कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. रास्त भाव दुकानातील अभिलेखे चौकशीसाठी उपलब्ध करून दिले नाहीत. तसेच लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे धान्य दिले नाही. तसेच गाव सोडून गेलेल्या लाभार्थ्यांच्या नातेवाईकांस परस्पर धान्य वितरण केल्याचे चौकशीत निदर्शनास आले. जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी याबाबत सुनावणी घेऊन त्यांच्या दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे. रेणापूर तालुक्यातील लहू विश्वनाथ कातळे यांच्या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून, धान्य जादा दराने विक्री, धान्याचा ताळमेळ नसणे, परिमाणानुसार धान्य वितरण न करणे आदी कारणांवरून परवाना निलंबित केला आहे. जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे राजाराम हणमंत चट यांच्या दुकानाचाही परवानाही निलंबित करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील मोळवणवाडी येथील वसंत व्यंकटराव चाटे यांच्या स्वस्त धान्य दुकानात अन्नसुरक्षा एपीएल, बीपीएल, अन्त्योदय योजनेच्या याद्यांमध्ये लाभार्थ्यांच्या नावात तफावत आढळली आहे. त्यामुळे या दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सर्व दुकानांसमोर लाभार्थ्यांच्या याद्या लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.