घरपोच सेवेच्या आदेशाकडे गॅस वितरकांचा कानाडोळा
By Admin | Updated: June 5, 2014 00:49 IST2014-06-05T00:44:54+5:302014-06-05T00:49:34+5:30
उस्मानाबाद : शहरातील गॅस एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडरची सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत.
घरपोच सेवेच्या आदेशाकडे गॅस वितरकांचा कानाडोळा
उस्मानाबाद : शहरातील गॅस एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडरची सेवा द्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी जारी केले आहेत. मात्र आठवडा उलटला तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याने ग्राहकांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. दुसरीकडे भर रस्त्यात सिलेंडर वाटप सुरू असल्याने सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील आठवड्यात गॅस एजन्सीधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, वजन-मापे निरीक्षक यांच्यासह एजन्सीधारकांची उपस्थिती होती. शहरी भागातील गॅस एजन्सीधारकांनी ग्राहकांना घरपोच सिलेंडरचा पुरवठा करणे आवश्यक आहे. मात्र पैसे घेऊनही गॅस एजन्सीधारक असा पुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. शहरातील ठराविक पार्इंटवर सिलेंडरची गाडी आणून तेथूनच त्या परिसरातील ग्राहकांना सिलेंडर दिले जात आहेत. यामुळे लेडिज क्लबसमोरील रस्ता तसेच बार्शी बायपास व अन्य ठिकाणी ग्राहक गर्दी करीत असल्याने वाहतुकीबरोबरच सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. याबाबतचा प्रश्न गॅस एजन्सीधारकांच्या बैठकीत उपस्थित झाल्यानंतर ग्राहकांना घरपोच सेवा पुरविणे एजन्सीधारकांची जबाबदारी असून, ती सुरक्षित पार पाडावी, घरपोच सेवा देण्यास टाळाटाळ करणार्यांवर कारवाई करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले होते. यावेळी त्यांनी एजन्सीधारकांचे म्हणणेही ऐकून घेतले. मात्र त्यानंतरही शहरात घरपोच सिलेंडर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. उस्मानाबादसह जिल्ह्यातील इतर शहरातही अशीच अवस्था असून, प्रशासनाने केवळ घोषणा न करता कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. (जि.प्र.)