भूसंपादनाचा पन्नास टक्के मोबदला वाटप
By Admin | Updated: June 30, 2014 01:02 IST2014-06-30T01:01:00+5:302014-06-30T01:02:19+5:30
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या बिडकीन परिसरातील जमिनीचा मोबदला वाटपाचे काम वेगाने सुरू आहे.

भूसंपादनाचा पन्नास टक्के मोबदला वाटप
औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या बिडकीन परिसरातील जमिनीचा मोबदला वाटपाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना ६१० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये निलजगाव येथील जमिनीचा संपूर्ण, तर उर्वरित चार गावांतील संपादित जमिनीचा निम्मा मोबदला वाटप झाला असल्याचे पैठण- फुलंब्रीचे उपविभागीय अधिकारी रवींद्र पवार यांनी सांगितले.
डीएमआयसी प्रकल्पासाठी बिडकीन, नांदलगाव, निलजगाव, बन्नी तांडा आणि बंगला तांडा या पाच गावांतील २,२६६ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी एकरी २३ लाख रुपये भाव दिला आहे. सर्व जमिनीचा मोबदला वाटप करण्यासाठी एकूण १,३१४ कोटी रुपयांची गरज आहे. त्यापैकी आतापर्यंत चार टप्प्यांत ९०० कोटी रुपये भूसंपादन अधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत. त्याचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत एकूण ६१० कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे.
यामध्ये निलजगाव येथील संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे, तर बिडकीन, नांदलगाव, बन्नी तांडा आणि बंगला तांडा या चार गावांतील जवळपास निम्म्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला आहे.
उर्वरित पन्नास टक्के शेतकऱ्यांना हा मोबदला मिळणे बाकी आहे. भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडे सध्या २९० कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. यातील शंभर कोटी रुपयांच्या रकमेचे अवार्ड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना येत्या आठवडाभरात ही शंभर कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहे.
भूसंपादनाचे चित्र
गाव हेक्टर
बिडकीन १,४२८
निलजगाव ५९
बंगला तांडा२८१
बन्नी तांडा१७८
नांदलगाव३३०
एकूण२,२६६
तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रतीक्षा
करमाडनंतर बिडकीन परिसरातील भूसंपादनाची प्रक्रियाही आता पूर्ण होत आली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यात औरंगाबाद आणि पैठण तालुक्यातील १८ गावांमधील ६ हजार ६१ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.