दूषितच पाणीपुरवठा
By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T01:54:25+5:302014-08-10T02:01:11+5:30
दूषितच पाणीपुरवठा

दूषितच पाणीपुरवठा
जालना : शहरात बहुतांश भागात पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सरासरी दूषित पाण्याचे प्रमाण १४ टक्के असल्याचे सांगितले जात असले तरी त्यापेक्षाही अधिक प्रमाण असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जायकवाडी योजना तसेच घाणेवाडी जलाशयाद्वारे सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्यासाठी ब्लिचिंगचा योग्य वापर नियमित केला जात असल्याचा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांचा दावा आहे.
मात्र तरीही अनेक भागात विशेषत: झोपडपट्टी वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होतो. त्याचे कारण म्हणजे शहरातील अंतर्गत जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली आहे. ही जलवाहिनी कालबाह्य झाल्याने ती दिवसेंदिवस फुटतच राहणार, असे खुद्द पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सांगतात.
मात्र जलवाहिनी फुटल्यामुळे त्यात दूषित पाणी मिश्रित होऊन नागरिकांना सार्वजनिक पाणीपुरवठ्याद्वारे दूषित पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. दूषित पाणी प्यायल्यामुळे पोटाच्या आजारांचे रुग्ण मोठ्या संख्येने येत असल्याचे शहरातील काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)