धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक
By Admin | Updated: July 26, 2014 00:38 IST2014-07-25T23:58:11+5:302014-07-26T00:38:11+5:30
जगदीश पिंगळे, बीड मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे.

धरणापासूनचे दूर अंतर पाणीपुरवठ्यासाठी खर्चिक
जगदीश पिंगळे, बीड
मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे आगमन झाले असले तरीही एकूण धरणातील पाणी फक्त १५ टक्केच राहिले आहे. धरणांपासून ते शहरापर्यंतचे अंतर बरेच असल्याने पाणीपुरवठ्यासाठी करावा लागणारा वाढता खर्च ही प्रशासनासमोर डोकेदुखी बनली आहे.
मराठवाड्यातील ८०४ धरणात सध्या २३ जुलैच्या आकडेवारीनुसार केवळ १५ टक्केच पाणी शिल्लक आहे. जायकवाडीत तर ४१ दलघमी म्हणजे केवळ २ टक्केच पाणी आहे. मराठवाड्यातील एकूण लहान मोठ्या धरणांची पाणी साठवण क्षमता ७५९९ दलघमी आहे पण सध्या ११०३ दलघमी पाणी आहे. सिध्देश्वर, माजलगाव, मांजरा, निम्नतेरणा, सीना, कोळेगाव ही धरणे तर मृतसाठ्याच्या खाली आहेत.
मराठवाड्यात २५ टक्केपेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यात जाफराबाद, जालना, बदनापूर, घनसांगवी, मंठा, गेवराई, शिरूर कासार, जळकोट, बिलोली, मुखेड, कंधार, हदगाव, देगलूर, किनवट, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, अर्धापूर, नायगाव खुर्द, परभणी, गंगाखेड, पूर्णा, पालम, सेलू, हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव, मानवत या तीस तालुक्यांचा समावेश आहे. फक्त उमरगा, लोहारा या तालुक्यात शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला.
‘कडा’ चे मुख्य अभियंता जोगदंड ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले जायकवाडीत गतवर्षी एप्रिलमध्येच शून्य टक्केखाली पाण्याची टक्केवारी आली होती त्या तुलनेत यंदा जुलैत पाणी प्रश्न चिंताजनक झाला आहे पाऊस योग्य झाल्यास अडचणी दूर होतील. मानवलोकचे डॉ. द्वारकादास लोहिया आणि कडाचे जलअभ्यासक अभियंता अरूण घाटे म्हणाले, आता दूरच्या धरणातील पाणी आणणे परवडणारे नाही. उस्मानाबाद शहरास १२० किमी अंतरावरून उजनी धरणातून पाणी येते त्यासाठी विजेचा खर्च काही कोटीच्या घरात जातो. मांजरा धरणातून अंबाजोगाई अन्य शहरांना पाणी पुरवठा होतो ही शहरेही धरणापासून खूप दूर आहेत.
परळी, शहर आणि थर्मल पॉवरस्टेशनला पाणीपुरवठा सोनपेठ भागातून होतो हे अंतरही खर्चिक आहे.
औरंगाबादची लोकसंख्या १९७१ ला जेव्हा जायकवाडी पूर्ण झाले तेव्हा १ लाख २० हजारांच्या आसपास होती आता २०१४ मध्ये ती औरंगाबाद आणि विस्तारित वसाहतीत १५ लाखांच्या पुढे आहे.
औरंगाबादला पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा खर्च ३० कोटीच्या आसपास येतो. पण नगर आणि जालना जिल्ह्णातील गावे दूर आहेत.
डॉ लोहिया म्हणाले, दरवर्षी आम्ही मराठवाडा वैधानिक मंडळाच्या बैठकीत या सूचना मांडीत असतो पण त्याची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही हे दुर्दैव आहे.