इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:37 AM2024-01-02T10:37:38+5:302024-01-02T10:38:52+5:30

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Disregard for industrial safety in terminating Inspector Raj, issue of safety is in discussion after company burning scandal in Sambhajinagar | इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

इन्स्पेक्टर राज संपविण्यात औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष, संभाजीनगरमधील कंपनी जळीत कांडानंतर सुरक्षेचा मुद्दा चर्चेत

छत्रपती संभाजीनगर : इन्स्पेक्टर राज संपविण्याच्या राज्य सरकारच्या व्यवसाय सुलभीकरण धोरणामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयासह कामगार विभागाचे अधिकार काढून घेण्यात आले. २०१६ मध्ये लागू झालेल्या या धोरणामुळे औद्योगिक सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने सनशाइन इंटरप्रायजेस कंपनीसारख्या जळीत कांडासारख्या घटना घडत असल्याचे दिसून येते.

वाळूज एमआयडीसीतील या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचे बळी गेले. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. फॅक्टरी ॲक्ट १९४८ नुसार २० अथवा त्यापेक्षा अधिक कामगार एकाच पाळीत काम करीत असलेल्या कारखान्याची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, रासायनिक अथवा ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांचा वापर करून उत्पादनाच्या ठिकाणी २० पेक्षा कमी कामगार असले तरीही अशा कारखान्याची नोंद या विभागाकडे करणे बंधनकारक आहे. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतींमधील सुमारे साडेतीन हजारांपैकी केवळ १ हजार ३३६ कारखान्यांचीच नोंदणी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे आहे.  

औद्योगिक सुरक्षा विभागाचा वचक संपला
-    कोणत्याही कारखान्याला अचानक भेट देऊन तपासणी करण्याचे फॅक्टरी इन्स्पेक्टरचे अधिकार काढून घेण्याचे धोरण २०१६ पासून राज्यात लागू करण्यात आले. 
-    कोणत्या कंपनीची तपासणी कधी करायची, याबाबतचे शेड्युल्ड मध्यवर्ती केंद्रीय निरीक्षण प्रणाली अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले जाते. सोबतच अधिकारी तपासणीसाठी कंपनीत येणार असल्याचे कारखानदाराला कळविण्यात येते. 
-    या धोरणामुळे औद्योगिक सुरक्षा विभागाचा वचक संपला आहे.   

कंपनीच्या वेबसाइटवर विदेशी संचालक आणि सीईओ - 
-    सनशाइन इंटरप्रायजेस कंपनीच्या वेबसाइटवर एक्सपर्ट टीम म्हणून आणि कंपनीचे संचालक म्हणून विदेशी व्यक्तींच्या नावासह छायाचित्र दर्शविण्यात आले आहे. यात पीटर पर्स नावाच्या व्यक्तीच्या छायाचित्राखाली त्याचे पद कंपनीचा डायरेक्टर असे दर्शविण्यात आले. 
-    तरुणीच्या छायाचित्राखाली सारा स्वीफ्ट असे नाव आणि 
एक्झिक्युटिव्ह असे तिचे पद दाखविण्यात आले. ऑलिया स्कॉट ही प्रोग्रामर तर डॅनियल जेम्स हा कंपनीचा सीईओ असल्याचे संकेतस्थळावर दर्शविण्यात आले आहे.
-     सन २००२ पासून कंपनी कार्यरत असल्याचे दाखवून हातमोजे आणि अन्य औद्योगिक सुरक्षा साधनांची छायाचित्रांसह माहिती दर्शविण्यात आली आहे. 

कंपनीचे मालक व ठेकेदार यांना पोलिस कोठडी
सनशाइन इंटरप्रायजेस या कंपनीचा मालक साबेरखान शब्बीरखान पठाण व ठेकेदार मोहम्मद हसिनोमुद्दीन शेख या दोघांना ५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. गुणारी यांनी सोमवारी दिले.  
 

Web Title: Disregard for industrial safety in terminating Inspector Raj, issue of safety is in discussion after company burning scandal in Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.