आरव्ही लाईफ सायन्सेस कंपनीत व्यवस्थापन व कामगारांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:02 IST2021-04-06T04:02:12+5:302021-04-06T04:02:12+5:30
:३५ कामगारांचे निलंबन ३५ कामगारांचे निलंबन : निलंबन नियमबाह्य, न्यू पँथर सेनेचा आरोप वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील ...

आरव्ही लाईफ सायन्सेस कंपनीत व्यवस्थापन व कामगारांत वाद
:३५ कामगारांचे निलंबन
३५ कामगारांचे निलंबन : निलंबन नियमबाह्य, न्यू पँथर सेनेचा आरोप
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील आरव्ही लाईफ सायन्सेस लि. कंपनीत व्यवस्थापन व कामगारांत वाद उफाळला आहे. यातून व्यवस्थापनाने ३५ कामगारांचे निलंबन केले.
पूर्वी आत्रा फार्मास्युटिकल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरव्ही लाईफ सायन्सेस लि.या कंपनीत औषधीचे उत्पादन होते. काही दिवसांपूर्वी या कंपनीतील ३५ कायमस्वरूपी कामगारांनी न्यू पँथर कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. कंपनीत युनियन स्थापन केल्यामुळे व्यवस्थापन व कामगारांत वाद सुरू झाला. कामगार व्यवस्थित काम करीत नसल्याचा ठपका ठेवत व्यवस्थापनाने संगीता लाचुरे, पुष्पा देशपांडे व विठ्ठल खांदेभराड या ३ कामगारांना लिखित माफीनामा देण्याचे पत्र २७ मार्चला दिले होते. मात्र, कामगारांनी माफीनामा देण्यास नकार दिला. यानंतर ३ एप्रिलला उपरोक्त तिघांसह युनिट अध्यक्ष संभाजी भापकर, उपाध्यक्ष विलास काळे, सचिव रमेश राठोड व कोषाध्यक्ष राजू चव्हाण यांना काम समाधानकारक नसल्याचे सांगून कंपनीच्या गेटवर रोखण्यात आले. या कामगारांना बाऊन्सर लावून बाहेर काढल्याचा आरोप आहे. कंपनीत काम करणाऱ्या २६ कामगारांचे निलंबनाचे आदेश व्यवस्थापनाने सोमवारी (दि.५) काढले. या निर्णयाच्या विरोधात सर्व कामगार दिवसभर कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बसून होते. या प्रकरणी युनियनचे अध्यक्ष अनिल जाभाडे यांनी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानुसार युनियन पदाधिकारी व व्यवस्थापनाचे मनीष दत्ता व राम अर्जुने यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामंजस्याने तोडगा काढण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक सावंत यांनी दिल्या.
माफीनामा देत नसल्याने निलंबन : व्यवस्थापन
एच. आर. विभागाचे मनीष दत्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आम्ही कोणत्याही कामगाराला कामावरून काढलेले नाही. व्यवस्थितपणे काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना लिखित माफीनामा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. माफीनामा देण्यास कामगार तयार नसल्याने त्यांचे निलंबन केल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल जाभाडे म्हणाले की, कामगारांनी आमच्या संघटनेत प्रवेश घेतल्याने व्यवस्थापन त्यांना हेतूपुरस्सर त्रास देत आहेत. पूर्वसूचना न देता कामगारांचे निलंबन आदेश काढल्याने कामगार आयुक्तांकडे तक्रार करून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
फोटो ओळ- वाळूज एमआयडीसीतील आरव्ही लाईफ सायन्सेस लि. मधील कामगारांना निलंबित केल्याने सर्व कामगार कंपनीसमोर दिवसभर ठाण मांडून होते.
-------------------