जागावाटपाआधीच वाद; छत्रपती संभाजीनगरात महायुतीत मोठा भाऊ कोण?
By विकास राऊत | Updated: December 16, 2025 17:44 IST2025-12-16T17:43:02+5:302025-12-16T17:44:15+5:30
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून तत्पूर्वी महायुतीचा मेळ कसा जमतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जागावाटपाआधीच वाद; छत्रपती संभाजीनगरात महायुतीत मोठा भाऊ कोण?
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवार पासून आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय महायुतीमध्ये आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी ‘लहान-मोठा’ असा भेद समोर आला आहे. भाजप आता सर्वत्र मोठ्या भावाच्या भूमिकेत असून त्याच धर्तीवर महापालिकेच्या निवडणुकीत देखील तो मान शिंदेसेनेने द्यावा, अशी अपेक्षा भाजपला आहे तर शिंदेसेना लहान-मोठ्याचा मुद्दा बाजूला ठेऊन महायुतीचा महापौर करण्याच्या भूमिकेने निवडणूक लढली पाहिजे, असा अजेंडा समोर आणत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून तत्पूर्वी महायुतीचा मेळ कसा जमतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महायुतीमध्ये भाजप, शिंदेसेना, रा.काँ.अ.प व रिपाईं आठवले गटाचा समावेश आहे. महायुतीबाबत भाजप आणि शिंदसेनेतच चर्चा होत आहे. रा.काँ.अ.प. आणि आठवले गटाचे या दाेन्ही पक्षांकडून सध्या नाव घेतले जात नाही. आठवले गटाने देखील भाजपकडे जागांची मागणी केली आहे.
महायुतीचा महापौर होणे महत्त्वाचे...
मोठा भाऊ, लहान भाऊ हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरेल. आजवरच्या सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढलो. सर्वांत जास्त जागा शिवसेनेच्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता लहान-मोठा असा विचार करण्यापेक्षा महापालिकेत महायुतीचा महापौर कसा बसेल, या भूमिकेतून महायुतीत लढायचे आहे.
- राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना
आम्हाला मोठा भाऊ म्हणून ट्रीट करा...
बैठकीत उद्या परवा चर्चा होईल. प्राथमिक चर्चेची फेरी होईल. महायुती व्हायला पाहिजे. त्यांनी आम्हाला मोठा भाऊ म्हणून ट्रीट केले पाहिजे. त्यांची २०१५ सारखी परिस्थिती नाही. भाजपचे सध्याचे संघटन आणि आमच्याकडील असलेली कार्यकर्ता फळी मोठी आहे. १० वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती नसल्यामुळे यावेळी भाजप मोठा पक्ष आहे, हे त्यांनी समजून घ्यावे
- किशोर शितोळे, भाजप
निमंत्रण आले तर ठीक नसता पर्याय खुले...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अद्याप महायुतीमधील दोन्ही पक्षांकडून काहीही निमंत्रण आलेले नाही. त्यांनी निमंत्रण दिले तर ठीक अन्यथा आम्हाला इतर पर्याय खुले आहेत. महायुतीसाठी ते सध्या एकमेकांमध्येच प्रस्ताव देत आहेत, अधिकृत चर्चा अद्याप झालेली नाही.
- अभिजित देशमुख, शहराध्यक्ष रा.काँ.अ.प.