रोग, रसशोषक किडींसाठी पोषक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:17+5:302021-01-08T04:08:17+5:30
--- औरंगाबाद - आर्द्रता, ढगाळ वातावरण आणि तुरळक पडणारा रिमझिम पाऊस रबीच्या पिकांवर रोगाचा आणि रसशोषण करणाऱ्या किडींसाठी ...

रोग, रसशोषक किडींसाठी पोषक वातावरण
---
औरंगाबाद - आर्द्रता, ढगाळ वातावरण आणि तुरळक पडणारा रिमझिम पाऊस रबीच्या पिकांवर रोगाचा आणि रसशोषण करणाऱ्या किडींसाठी पोषक आहे. असेच वातावरण आणखी एक-दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. त्याबद्दल मंगळवारी दुपारी निश्चित कळेल. मात्र, या वातावरणात पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषीविज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी केले आहे.
लोकमतशी संवाद साधताना डाॅ. झाडे म्हणाले, सध्या रबी ज्वीरीचे कणसे बाहेर निघण्याची, पोटरीत असण्याची अवस्था आहे. ढगाळ वातावरण, आर्द्रता, रिमझिम पाऊस या सर्व गोष्टी रोग आणि किडींसाठी पोषक आहेत. त्यामुळे पिकांवर मावा, तुडतुडे, किडे, पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आठ ते दहा दिवसांत वाढेल. सद्यस्थितीत औरंगाबाद जिल्हा व मराठवाड्यात विचार केला तर गव्हाच्या पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याच्या व्यवस्थापनासाठी कार्बनडाझीन किंवा मॅनकोझीन दोन्हीपैकी एक प्रति २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल. या परिसरात कांद्यासह भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे. कांद्याची पात पिवळी पडते, भाज्याची पाते करपतात. ते करप्या रोगामुळे होते. त्यासाठी हे वातावरण पोषक आहे. ते होऊ नये म्हणून मंगळवारी व बुधवारी वरील दोन्हीपैकी एका औषधांची फवारणी करून घ्यावी.
--
आंब्याचा फुलोरा धोक्यात
---
आंब्याला सध्या फुलोरा आला आहे. फळबागेतील भुरी रोगाचा प्रादुर्भाव या वातावरणामुळे होऊ शकतो. हे टाळण्यासाठी प्रोपीओनेड १० मिलि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास व्यवस्थापन करता येते किंवा आंब्याच्या फुलाेऱ्यावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्याच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन ०.५ मिलि किंवा लॅम्डाताय हॅलोथ्रीन पाच टक्के १० मिलि प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला डाॅ. किशोर झाडे यांनी दिला आहे.