अपहार प्रकरण : ग्रामसेवकाला अभय
By Admin | Updated: July 21, 2014 00:21 IST2014-07-20T23:58:10+5:302014-07-21T00:21:10+5:30
बीड : शिरुर तालुक्यातील वारणी, गोमळवाडा येथे शौचालय कामांमध्ये लाखोंचा अपहार झाला होता.

अपहार प्रकरण : ग्रामसेवकाला अभय
बीड : शिरुर तालुक्यातील वारणी, गोमळवाडा येथे शौचालय कामांमध्ये लाखोंचा अपहार झाला होता. तेथील ग्रामसेवकावर कारवाईला अधिकाऱ्यांना पंधरा दिवस उलटूनही मुहूर्त मिळालेला नाही.
वारणी व गोमळवाडा या दोन्ही गावच्या ग्रामसेवकपदाचा पदभार अशोक कदम यांच्याकडे आहे. शौचलयांसाठी आलेली रक्कम बँक खात्यातून परस्पर उचलून तब्बल ३६ लाख ४९ हजार ७२४ रुपयांचा अपहार करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालिन गटविकास अधिकारी बाबासाहेब सूर्यवंशी यांनी ग्रामसेवक अशोक कदम याच्याविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस केली होती. ‘लोकमत’ने ७ जुलै रोजी ‘शौचालयाचे ३६ लाख ग्रामसेवकाच्या घरात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते. त्यानंतर पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नईमोद्दीन कुरेशी यांनी स्वतंत्र पथकामार्फत चौकशीचे आदेश दिले. गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्याकडील पदभारही काढून घेण्यात आला; परंतु ग्रामसेवक कदम यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पथकाने केलेल्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
अहवाल दिला
शिरुरचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे म्हणाले, मी पदभार घेतल्यावर ग्रामसेवक अशोक कदम यांचा अहवाल वरिष्ठांकडे दिला आहे. अनियमितता करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. (प्रतिनिधी)