शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
By Admin | Updated: May 22, 2014 00:12 IST2014-05-21T23:58:57+5:302014-05-22T00:12:11+5:30
लातूर : खाजगी शाळांतील बहुतांश मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची आॅनलाईन माहिती भरली नसल्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत.

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित
लातूर : खाजगी प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बहुतांश मुख्याध्यापकांनी पूर्वमाध्यमिक व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची आॅनलाईन माहिती भरली नसल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहत आहेत. जिल्ह्यात पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीचे ५०० तर अल्पसंख्याक शिष्यवृत्तीचे ३० हजार विद्यार्थी पात्र आहेत. मात्र त्यांच्या बँक खात्याची माहिती आॅनलाईन भरली नसल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती आॅनलाईन भरणे आवश्यक आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरणे बंधनकारक आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश खाजगी माध्यमिक व प्राथमिकच्या मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती भरलेली नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा होत नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी ही माहिती तात्काळ डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.स्कूल.महाराष्ट्र.जीओव्ही.इन या संकेतस्थळावर आॅनलाईन भरावी. ज्या मुख्याध्यापकांनी ही माहिती आॅनलाईन भरली नाही, त्यांना याबाबत जबाबदार धरण्यात येईल, अशी सूचना शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांनी केली आहे. ३१ मेपर्यंत ही माहिती न भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षणाधिकारी तुपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी) जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे ५०० व अल्पसंंख्यांक शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी ३० हजार आहेत. यातील बहुतांश मुख्याध्यापकांनी माहिती अद्याप भरली नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी, यासाठी मुख्याध्यापकांनी बँक खात्याची माहिती द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.