कचराकुंड्याविना शहरात घाणीचे साम्राज्य

By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:37:50+5:302014-06-03T00:42:21+5:30

जालना : जुना जालनासह मध्यवस्ती तसेच चारही बाजुंच्या वसाहतीत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कचरा साठविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने कचराकुंड्या ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत़

Dirt empire in the city of Trichakundi | कचराकुंड्याविना शहरात घाणीचे साम्राज्य

कचराकुंड्याविना शहरात घाणीचे साम्राज्य

 जालना : जुना जालनासह मध्यवस्ती तसेच चारही बाजुंच्या वसाहतीत स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून कचरा साठविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने कचराकुंड्या ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत़ दरम्यान, यापूर्वी काही ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी क्रेनव्दारे उचलता येणार्‍या मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, आजघडीला शहरातील कचराकुंड्या गायब झाल्या आहेत. शहरातील कचरा योग्य ठिकाणी जमा व्हावा, तो रस्त्यावर पसरू नये याकरिता पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या़ ज्या भागात कचराकुंडया नाहीत तेथे घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या़; परंतु आज रोजी दोन्हींची अवस्था वाईट असून, ठेवलेल्या कचराकुंड्याच गायब झाल्या आहेत़ लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे़ शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी १२० कचराकुंड्या, १४ घंटागाड्या, डोझर, १, ट्रॅक्टर ४, कचरा वाहून नेणारी गाडी १ असा लवाजमा आहे़ एवढे असूनही कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची समस्या कायम आहे़ बहुतांश कचराकुंडया मोडकळीस आल्या आहेत. कचराकुंड्या सहज सरकविण्यासाठी असलेली चाके निखळून पडली आहेत़ काही चाके आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत़ कुंड्या फुटल्या आहेत़ परिणामी, नागरिक कचरा कुंडीत न टाकता सभोवताली टाकून मोकळे होतात़ ज्या ठिकाणी कुंड्या ठेवल्या होत्या, आज त्या तेथे दिसत नाहीत़ यामुळे शहरात कचर्‍याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ पालिकाही साचलेला कचरा नियमित उचलून नेत नसल्याने दुर्गंधीचे साम्राज्य कायम आहे़ ‘स्वच्छ जालना सुंदर जालना’ अशी घोषणा केवळ कागदावरच दिसून येते़ शहराचे दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत आहे़ पालिकेच्या अनास्थेमुळे यात भर पडत आहे़ ज्या ठिकाणी कचराकुंड्या नाहीत, तेथील नागरिकांसाठी घंटागाड्या सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून घंटागाड्यांना त्या-त्या भागात फिरकल्याच नाहीत. शहरातील मुख्य रस्ते कचरामय झाले आहेत़ पालिकेने कचराकुंड्यांची दुरुस्ती तसेच घंटागाड्या नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़ (प्रतिनिधी) पालिका म्हणते, नागरिकांसाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत़ काही नागरिकच कचरा जाळत असल्याने कुंड्यांचे नुकसान होत आहे़ काही जणांनी कुंड्यांची चाकेही काढून घेतली आहेत़ कचराकुंड्यांचा व्यवस्थित वापर करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़

Web Title: Dirt empire in the city of Trichakundi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.