वसतिगृहात दारूच्या बाटल्या..!
By Admin | Updated: July 17, 2014 01:09 IST2014-07-17T00:57:09+5:302014-07-17T01:09:16+5:30
उस्मानाबाद : श्री क्षेत्र तुळजापूर येथे चालविण्यात येत असलेल्या श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहास भेट दिली

वसतिगृहात दारूच्या बाटल्या..!
उस्मानाबाद : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली व श्री तुळाजभवानी मंदिर संस्थानअंतर्गत श्री क्षेत्र तुळजापूर येथे चालविण्यात येत असलेल्या श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहास भेट दिली असता तेथे राहणारे विद्यार्थी अनेक समस्यांना तोंड देत असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, या वसतिगृहांतील काही खोल्यांमध्ये चक्क दारूच्या बाटल्याही आढळून आल्याने या वसतीगृहात नेमके विद्यार्थी घडतात की बिघडतात, असा प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.
शैक्षणिक सत्रास नुकताच प्रारंभ झाला असून, बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय तसेच महाविद्यालयांच्या वतीने वसतिगृहेही चालविली जातात. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था केली जाते. शिवाय वीज, पाणी आदी सुविधाही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधींनी बुधवारी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहास भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. महाविद्यालयापासून १ ते २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतिगृहातील खोल्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे व त्याहून कहर म्हणजे एका खोलीत चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचे यावेळी समोर आले. विद्यार्थ्यांच्या निवासासाठी बांधण्यात आलेल्या खोल्यांच्या खिडक्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खिडक्यांना काचा किंवा दरवाजेही नसल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी खोल्यांत शिरते. बहुतांश खोल्यांमधील लाईट फिटींगचीही दुरवस्था झाल्याचे समोर आले. शिवाय जागोजागी कचराही साचला असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वसतिगृह इमारतीच्या पाठिमागील भिंतीला ओल लागली असून, भिंतीवर झाडे-झुडपे वाढली असल्याने तीही धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात इमारतीत जागोजागी गळती लागते. यामुळे विद्यार्थ्यांना झोपणे तर सोडाच बसायलाही जागा शिल्लक राहत नाही. एकेका खोलीत तीन-तीन विद्यार्थी राहत असून, पावसाळ्याच्या दिवसात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वसतिगृहातील काही खोल्या कुलूपबंद असून, यातीलच एका खोलीत काही विजेचे साहित्यही पडल्याचे दिसून आले. इमारतीत अनेक ठिकाणी विजेची वायरिंग उघडी पडल्याने विद्यार्थ्यांना यापासून धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
इमारतीच्या छतावरही उघड्या वायरी पडलेल्या असून, छतावर फिरताना एखाद्या विद्यार्थ्यांच्या पायाला ते वायर लागून शॉक बसण्याची शक्यता आहे. मात्र, याकडेही संबंधितांचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
मंदिर देवस्थानचे दुर्लक्ष
ग्रामीण भागातील जुने व दर्जेदार महाविद्यालय म्हणून तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे पाहिले जाते. गुणवत्तेच्या बाबतीत या महाविद्यालयाने सातत्य राखले असले तरी पायाभूत सुविधा पुरविण्याकडे कानाडोळा होत आहे. त्यामुळे याचा फटका विद्यार्थ्यांना सोसावा लागतो. याबाबत तेथील काही कर्मचाऱ्यांना बोलते केले असता त्यांनी याचे खापर मंदिर संस्थानवर फोडले. अभियांत्रिकी महाविद्यालयासारखा शैक्षणिक उपक्रम देवस्थानतर्फे राबविला जात असल्याने अनेक दानशूर देवस्थानला भरीव आर्थिक देणगी देतात. मात्र, त्या तुलनेत निधी देण्यास देवस्थानकडून कानाडोळा केला जात असल्याचे या कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर सांगितले. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठ महाविद्यालयाकडून देवस्थानकडे निधीची मागणी वेळोवेळी करण्यात येते. मात्र, याबाबत ठोस निर्णय होत नसल्याची खंतही या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, याबाबत मंदिर संस्थानच्या एका जबाबदार अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता महाविद्यालयाने पायाभूत सुविधांसाठी निधीची मागणी केल्यास निधी पुरविण्यात येतो, असे स्पष्ट केले.